हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपीस सहा महिन्यांनी अटक
अटकेनंतर रेकॉर्डवरील आरोपीचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – पत्नीला पळवून स्वतच्या घरात आणून ठेवल्याच्या रागातून महेश राजेंद्र राख या व्यक्तीची हत्या करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी करवीर पोलिसांच्या मदतीने चेंबूर परिसरातून अटक केली. सिद्धांत शशिकांत गवळी असे या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कोल्हापूरच्या करवीर आणि जुना राजावाडा पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद आहे. हत्येनंतर तो पळून गेला होता, अखेर सहा महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला करवीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याला घेऊन संबंधित पोलीस कोल्हापूरला रवाना झाल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले.
कोल्हापूरचा रहिवाशी असलेला ओंकार शिंदे हा व्यावसायिक असून त्याचा महेश हा मित्र आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्याच्यामार्फत महेशची आदित्य गवळी आणि सिद्धांत गवळीशी ओळख झाली होती. त्यामुळे तो त्यांचाही चांगला मित्र झाला होता. एक वर्षांपूर्वी त्याने आदित्यच्या पत्नीला पळवून त्याच्या घरी आणले होते. त्याचा त्याच्या मनात राग होता. तसेच ओंकारने महेशच्या मित्राच्या घरावर बिअरच्या बाटल्या मारुन काचा फोडल्या होता असे आरोपींना संशय आहे. त्यातून त्यांच्यात वाद सुरु होता. याच वादातून आरोपींनी महेशला अहिल्याबाई होळकर नगर येथे फोन करुन बोलाविले होते. तिथे एका गटाने महेशवर तलवारीसह फायटर, काठी, लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला होता.
या हल्ल्यात जखमी झालेल्या महेशचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. या हत्येनंतर सिद्धांत ऊर्फ सिद्धार्थ शशिकांत गवळी, आदित्य शशिकांत गवळी, धीरज शर्मा, ऋषभ सोळोखे मगर, मयुर कांबळे, पियुष पाटील, सद्दाम कुंडलेसह इतर सहकार्याविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. हत्येनंतर सिद्धांत हा पळून गेला होता. त्यामुळे त्याचा करवीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. मात्र तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना सिद्धांत हा चेंबूरच्या आरसीएफ, म्हाडा कॉलनीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती करवीर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला शेअर करुन त्याच्या अटकेसाठी विनंती केली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज, पोलीस उपनिरीक्षक नार्वेकर,पोलीस हवालदार शिंदे, मगर, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सपाटे, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई पाटील यांनी संयुक्त कारवाई करुन व्हिडीओकॉल इमारतीच्या बिल्डींग क्रमांक नऊ, फ्लॅट क्रमांक 415 मध्ये छापा टाकून सिद्धांतला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत हत्येच्या गुन्ह्यांतील तोच वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन करवीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्याला घेऊन संबंधित पोलीस कोल्हापूरला रवाना झाले होते. सिद्धांत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध करवीर आणि जुना राजावाडा पोलीस ठाण्यात सहाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हत्येच्या गुन्ह्यांत तो सहा महिन्यांपासून फरार होता, अखेर त्याला मुंबईतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.