दिवसा रेकी करुन रात्री घरफोडी करणारा आरोपी गजाआड

विविध पोलीस ठाण्यात अकराहून अधिक गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जून २०२६
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्री घरफोडी करणार्‍या एका सराईत आरोपीस गजाआड करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. जाहिदअली रोशनअली कुरेशी ऊर्फ मुर्गी असे या आरोपीचे नाव असून त्याने दोन दिवसांपूर्वी खार येथील एका हॉटेलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांतील ६ लाख ३८ हजाराचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. जाहिदअलीविरुद्ध आंबोली, खार, निर्मलनगर, वांद्रे पोलीस ठाण्यात अकराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यश शामसुंदर बांदकर हे भांडुपचे रहिवाशी आहे. सध्या ते खार येथील लिंकिंग रोडवर असलेल्या रेडिओ हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात. २० जूनला पहाटे साडेपाच ते पावणेसहाच्या दरम्यान हॉटेलमध्ये चोरी केली होती. अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये प्रवेश करुन तिजोरीतील ६ लाख ८१ हजार रुपयांची कॅश आणि एक मोबाईल असा ६ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हॉटेलच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला होता. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच यश बांदकर यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन संशयित आरोपी पवई परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत सातपुते, पोलीस उपनिरीक्षक माणिक घोगरे, पोलीस हवालदार आनंद निकम, पोलीस शिपाई अजीत जाधव, संतोष कांबळे, अभिजीत कदम, गणेश खेडकर, सचिन चव्हाण, स्वप्निल काकडे आदी पथकाने पवईतील फिल्टरपाडा परिसरातून जाहीरअलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईलसह कॅश असा ६ लाख ३८ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

तपासात जाहिदअली हा पवईतील फिल्टरपाडा, पठाणवाडी झोपडपट्टीत राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे अकराहून अधिक गुन्हे दाखल आहेत. दिवसा रेकी करुन तो रात्रीच्या वेळेस घरफोडी करत होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दहा तासांत पोलिसांनी आरोपीला चोरीचा मुद्देमालासह अटक केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page