एमबीबीएस प्रवेशाच्या नावाने फसवणुक करणारा ठग गजाआड

बारा वर्षांपासून वॉण्टेड ठगाविरुद्ध वीसहून अधिक गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जून २०२६
मुंबई, – विविध नामांकित कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रवेशाच्या नावाने अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्‍या एका सराईत रेकॉर्डवरील ठगाला सर जे. जे मार्ग पोलिसांनी अटक केली. आबीद युसूफ अन्सारी असे या ५१ वर्षीय आरोपीचे नाव असून तो गेल्या बारा वर्षांपासून फरार होता. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह महाराष्ट्र आणि इतर राज्यात अठरा ते वीसहून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यातील तक्रारदार विष्णू रत्न गुडेकर यांच्या मुलीला एमबीबीएससाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच प्रयत्नात असताना त्यांची आबीद अन्सारीशी ओळख झाली होती. त्याने त्यांच्या मुलीला एमबीबीएस शिक्षणासाठी ठाण्यातील कळवा येथील राजीव गांधी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून टप्याटप्याने ४२ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांच्या मुलीला प्रवेश दिला नाही. तिला प्रवेश मिळाल्याचे बोगस दस्तावेज दिले होते, मात्र त्याची शहानिशा केल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे संबंधित दस्तावेज बोगस असल्याचे उघडकीस आले होते.

याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्याने एमबीबीएस प्रवेशासाठी दिलेल्या ४२ लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही. काही दिवसांनी तो पळून गेला होता. या प्रकारानंतर त्यांनी सर जे. जे मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख, पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक् प्रशांत नेकर, पोलीस हवालदार तडवी, घाडगे, पोलीस शिपाई शेवरे, चौधरी, पठाण व तांत्रिक मदत पोलीस सचिन पाटील यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तपासात आबीदने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. फसवणुकीनंतर तो गेल्या बारा वर्षांपासून फरार होता. त्यामुळे त्याची माहिती काढण्याचे काम सुरु असताना तो आग्रीपाडा येथील एका अपार्टमेंटमध्ये लपला असल्याची माहिती पोलिसांना समजले होते. या माहितीनंतर या पथकाने त्याला आग्रीपाडा येथून अटक केली.

तपासात आबीद हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात तीन, महाराष्ट्रात पाच, गुजरात चार, उत्तराखंड एक, दिल्ली तीन आणि मध्यप्रदेशात दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव कोर्टाने जाहीरनामा जारी करुन वॉण्टेड आरोपी म्हणून घोषित केले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आबीदने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page