मुलासोबत लग्नास नकार दिला म्हणून भावी सासूची बदनामी

सोशल मिडीयावर अश्‍लील मॉर्फ फोटोसह मॅसेज अपलोड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जून २०२६
मुंबई, – मुलासोबत लग्नास नकार दिला म्हणून रागाच्या भरात एका तरुणीने तिच्याच भावी सासूची सोशल मिडीयावर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार शिवडी परिसरात उघडकीस आला आहे. तिचे अश्‍लील मॉर्फ केलेले फोटोसह मॅसेज अपलोड करुन तिने तक्रारदार महिलेची बदनामी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी जास्मीन नावाच्या आरोपी तरुणीविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

३८ वर्षांची तक्रारदार महिला ही शिवडीतील जेरबाई वाडिया रोडवरील एका निवासी अपार्टमेंटमध्ये राहते. ती महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षारक्षक मंडळ, ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक विभागात कार्यरत आहे. तिला २२ वर्षांचा एक मुलगा असून त्याची सोशल मिडीयावरुन जास्मीन या तरुणीशी ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून ते दोघेही प्रेमसंबंधात होते. गेल्या वर्षी जास्मीन ही तिच्या घरी आली आणि तिने तिच्या मुलाशी लग्न करायचे आहे असे सांगितले. याबाबत तिने तिच्या मुलाकडे जास्मीनविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला तिच्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्यामुळे तिने स्वतहून तिची माहिती काढण्याचा प्रयत्न केला.

याच दरम्यान तिने जास्मीनच्या आईशी बोलणे केले होते. यावेळी तिनेही त्यांच्या लग्नाबाबत आग्रह धरला होता. मात्र तिचा मुलगा काहीच कामधंदा करत नसल्याने त्यांनी एप्रिल २०२६ नंतर त्यांचे लग्न करु असे सांगितले होते. काही दिवसांनी जास्मीन ही लग्नावरुन तिच्या मुलाशी सतत वाद घालून भांडण करत होती. तिच्याकडून सतत त्याला लग्नासाठी दबाव येत होता. सोशल मिडीयावर विविध व्हिडीओ अपलोड करुन त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तो प्रचंड घाबरला होता. त्याला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. त्यातून त्याने त्याच्या आईला त्याला जास्मीनसोबत लग्न करायचे नाही. ती प्रचंड हट्टी असून तिचा स्वभाव चांगला नाही, ती पान, गुटखा खात असल्याचे मुलाकडून समजले होते. त्यामुळे तिने जास्मीनला लग्नासाठी स्पष्टपणे नकार दिला होता.

त्याचा तिच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून तिने तिच्यासह तिच्या मुलाला शिवीगाळ करुन त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. २९ एप्रिल २०२६ रोजी तिने तिच्या मुलाविरुद्ध सोशल मिडीयावर एक स्टोरी अपलोड केली होती. त्यात तिने तक्रारदार महिलेचा जुना फोटोमधील चेहरा वापरुन दुसर्‍या महिलेला नग्न अवस्थेतील पुरुषासोबत मॉर्फ केलेला फोटो अपलोड केला आहे. फोटोखाली तिने तिच्याविषयी अश्‍लील मॅसेज दिला होता. हा फोटोसह मॅसेज पाहिल्यानतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.

तिच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मजकूर तसेच फोटो अपलोड करुन तिने तिची बदनामी केली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना सांगून जास्मीनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून याच गुन्ह्यांत जास्मीनची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page