मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जून २०२६
मुंबई, – जोगेश्वरी येथे राहणार्या अजय कुपूस्वामी या २९ वर्षांच्या तरुणाची बर्फ फोडण्याच्या टोच्याने वार करुन हत्या केल्याप्रकरणी षणमुगम राजेंद्र ऊर्फ सोनू ऊर्फ सॅम या रेकॉर्डवरील आरोपीला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून आजन्म कारावासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. बिअर आणण्यास नकार दिला म्हणून अजयची सोनूने हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
ही घटना २६ मे २०२० रोजी रात्री पावणेबारा वाजता जोगेश्वरीतील प्रेमनगर, मुत्तूमारी मंदिराजवळील मद्रासी मशिदीसमोरील गल्लीत घडली होती. याच परिसरात अजय हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता तर सोनूचा परिवारही तिथे वास्तव्यास होते. सोनू हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याची परिसरात प्रचंड दहशत होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोणीही पोलिसांत तक्रार करत नव्हते. २६ मेला त्याने अजयला बिअर आणण्यास सांगितले, मात्र त्याने बिअर आणण्यास नकार दिला. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यातून रागाच्या भरात त्याने अजयवर बर्फ फोडण्याच्या टोच्याने प्राणघातक हल्ला केला.
छातीत गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करणयात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अजयचा भाऊ विजय कप्पूस्वामी द्रविड याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी षणमुगम राजेंद्र ऊर्फ सोनू ऊर्फ सॅम याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर सोनू हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला काही तासांत जोगेश्वरी येथून पोलिसांनी अटक केली होती.
तपासात सोनू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मारामारी, जबरी चोरीसह इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले होते. २०११ रोजी त्याला पोलिसांनी तडीपार केले होते. तेव्हापासून तो नालासोपारा परिसरात राहत होता. हत्येच्या पंधरा दिवसांपूर्वीच तो त्याच्या आईला भेटण्यासाठी जोगेश्वरी येथे आला होता. यावेळी बिअरवरुन झालेल्या वादातून त्याने अजयची हत्या केली होती. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक मधुसुदन नाईक यांच्याकडे होता. त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करुन पोलीस निरीक्षक मधुसुदन नाईक यांनी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले होते.
गेल्या चार वर्षांपासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होते. अलीकडेच खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने सोनूला हत्येच्या गुन्ह्यांत दोषी ठरविले. गुरुवारी १८ जूनला कोर्टाने सोनूला हत्येप्रकरणी आजन्म कारावासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. मारामारीच्या गुन्ह्यांत तीन वर्ष कारावास आणि दोन हजाराचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे.
या खटल्यात सरकारी वकिल म्हणून सुधीर सपकाळे, योगेश आंबेकर यांनी कामकाज पाहिले. तसेच आरोपीचा शिक्षा होऊन त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे सादर करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे, मधुसुदन नाईक, कोर्ट कारकून सुनिल नांदे, महिला पोलीस शिपाई सुरेखा मोरे, गुन्हे लेखनिक सहाय्यक फौजदार विजय शिंदे, पोलीस शिपाई अमोल पवार, समन्स व वॉरंट पोलीस हवालदार गणेश बर्वे, पोलीस शिपाई विवेक कांबळी यांनी विशेष परिश्रम घेतले होते.