फ्लॅटसाठी घेतलेल्या ३५ लाखांचा अपहार करुन फसवणुक

वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जून २०२६
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ३५ लाखांचा अपहार करुन एका इस्टेट एजंटची फसवणुक केल्याप्रकरणी आशिष प्रकाश चंद्रगिरी या मुख्य आरोपीस तीन महिन्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. आशिष हा एका खाजगी कंपनीचा संचालक असून तो गेल्या पाच वर्षांपासून तक्रारदार व्यक्तीला वेगवेगळे फ्लॅट दाखवून त्यांची फसवणुक करत होता. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

तुकाराम दगडू गोपाळे हे बोरिवलीतील काजूपाडा परिसरात राहत असून ते इस्टेट एजाट म्हणून काम करतात. आशिष चंद्रगिरी हे त्यांच्या परिचित असून त्याची मेडलाईफ ३६५ मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. याच कंपनीत त्यांची मुलगी एक वर्ष कामाला होती. २०२१ साली त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, ते स्वत इस्टेट एजंट असल्याने त्यांनी काजूपाडा परिसरात एक फ्लॅट पाहिला होता. मात्र आशिषने त्यांना तिथे फ्लॅट न देता त्यांना बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ ४५ लाखांमध्ये फ्लॅट देतो. त्यासाठी त्यांना आधी तीस लाखांची रक्कम भरावी लागेल असे सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याला टप्याटप्याने ३५ लाख ७७ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र त्याने त्यांना वेगवेगळे फ्लॅट दाखवून एकाही फ्लॅटची बुकींग केली नव्हती किंवा फ्लॅटचा ताबा दिला नाही.

याच दरम्यान त्याने तुकाराम गोपाळे यांच्याकडून फ्लॅटसाठी ३० लाख रुपये घेतल्याची तसेच त्यांना फ्लॅटचा ताबा न दिल्यास एप्रिल २०२२ पर्यंत ६७ लाख ५० हजार रुपये व्याजासहीत देण्याचा एक करार केला होता. तुकाराम गोपाळे यांनी चाळीतील रुमची विक्री करुन आशिषला ही रक्कम दिली होती. त्यातच त्याने दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न दिल्याने गोपाळे कुटुंबिय रस्त्यावर आले होते. त्यामुळे त्यांनी त्याला काही दिवसांसाठी पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची तसेच जोपर्यंत फ्लॅटचा ताबा मिळत नाही तोपर्यंत त्यांना भाड्याने रुम देण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करुन त्याने त्यांची राहण्याची व्यवस्था साईदिप सोसायटीमध्ये केली होती.

काही महिन्यानंतर त्याने त्यांना तोच फ्लॅट देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याकडून फ्लॅटसाठी आणखीन दहा लाखांची मागणी केली. उर्वरित रक्कम तो स्वत भरुन फ्लॅटचे कागदपत्रे आणि ताबा देतो असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला आणखीन चार लाख रुपये दिले तसेच दिड वर्ष त्यांनी स्वतहून तीन लाखांचे भाडे भरले होते. आशिषकडून फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्यासोबत सुरु असलेला व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने विरारचा फ्लॅट विकून त्यांना पैसे देण्याचे कबुल केले, मात्र दिलेल्या मुदतीत पैसे दिले नाही. तसेच त्याने दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आशिषविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला तीन महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page