मद्यप्राशन करुन कार चालवून पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जून २०२६
मुंबई, – मद्यप्राशन करुन कार चालवून नाकाबंदी करणार्या पोलिसांशी शिवीगाळ तसेच हुज्जत घालून, पोलीस हवालदार महिलेवर हल्ला करुन दुखापत करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका तरुणीसह दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राशी जितेंद्र शहा आणि तनिष उमेश उदेशी अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही नंतर मेडीकलसाठी भाभा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. चौकशीनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.
संजय आत्माराम भिलारे हे पोलीस उपनिरीक्षक असून सध्या वांद्रे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा दिड ते साडेतीन दरम्यान ते त्यांचे सहकारी पोलीस हवालदार नाईक, पोळ, गुजर, साळुंखे, निकम, गायकवाड यांच्यासोबत वांद्रे येथील के. सी रोड, ओएनजीसी कॉलनीजवळ ड्रंक ऍण्ड ड्राईव्हसह वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकावर कारवाई करत होते. काही वेळानंतर पश्चिम कंट्रोल रुमच्या आदेशानंतर त्यांच्यासोबत वांद्रे पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार महाडिक, महिला पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस शिपाई भालके, बीट मार्शल पोलीस शिपाई थोरात हेदखील तिथे हजर झाले होते.
नाकाबंदी कारवाई सुरु असताना पोलिसांनी एका कारला थांबविले. या कारमध्ये राशी शहा ही २२ वर्षांची तरुणी होती. तिने मद्यप्राशन केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तिला ब्रेथ एनलायझरच्या सहाय्याने ब्लो घेण्यास सांगितले. यावेळी तिने तसे करण्यास नकार देत पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. आपण मद्यप्राशन केले नाही तसेच तिचे वडिल आल्याशिवाय आपण ब्लो देणार नाही असा पवित्रा घेतला. ती आरडाओरड करुन पोलिसांशी वाद घालत असल्याने महिला पोलीस हवालदार आव्हाड हिने तिला शांत राहण्यास सांगून तिचा ब्लो घेतला. त्यात तिने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले.
याच दरम्यान तिथे अन्य एका कारमधून तनिष उदेशी आला होता. त्यानेही मद्यप्राशन करुन कार चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दोघांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यावेळी या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करुन हुज्जत घालण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. काही वेळानंतर राशीने आव्हाड हिला जोरात लाथ मारुन तिचे केस ओढून हाताच्या नखांनी ओरखडून दुखापत केली. दुसरीकडे तनिषनेही पोलिसांशी धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
यावेळी या दोघांनी पोलीस ठाण्यातही धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर उपनिरीक्षक् संजय भिलारे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राशी शहा आणि तनिष उदेशी यांच्याविरुद्ध मद्यप्राशन करुन कार चालविणे, नाकाबंदी करणार्या पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणे, महिला पोलीस हवालदार आव्हाड यांना मारहाण करुन दुखापत करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. चौकशीनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले. गुन्हा दाखल होताच त्यांना मेडीकलसाठी भाभा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. प्राथमिक तपासात राशी शहा ही ताडदेवच्या भाटिया हॉस्पिटल, रतन लक्झरिया जहॉंगीर दाडी स्ट्रिट तर तनिष हा जेकब सर्कल, नायर रोडच्या विवेरा अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.