मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जून २०२६
मुंबई, – शहरातील एका प्रतिष्ठीत बिल्डरला खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका वयोवृद्धासह दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. आनंद किशन बिडलानी (६१) आणि रमेश जगमलसिंह चावरिया (५८)अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर पाचजणांची नावे समोर आली असून त्यात मनदिपसिंह सेहगल ऊर्फ लाडी, जसविंदर मनिकतला ऊर्फ गंजा, संदीप भामरी, गुरजीतसिंह सेहगल, दिपकसिंह सेहगल यांचा समावेश आहे. या सर्वांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने आतापर्यंत तक्रारदारासह त्याचे बिल्डर मालकांकडून २८ लाख ५० हजाराची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार सायन-कोळीवाडा परिसरात राहत असून एका खाजगी बांधकाम क्षेत्राशी संबंंधित कंपनीत मॅनेजर ऑपरेशन म्हणून काम करतात. ही कंपनी शहरात विविध एसआरए प्रकल्प हाती घेऊन तिथे नवीन इमारतीचे बांधकाम करते. डिसेंबर २०२३ पासून कंपनीकडून जीटीबीनगर जे. के भसीन मार्गावरील काही एसआरए इमारतीचे काम सुरु आहे. याच ठिकाणी त्यांची संबंधित सातही आरोपीशी ओळख झाली होती. ते सर्वजण त्यांना धमकावून तिथे बांधकाम करता येणार नाही. तरीही बांधकाम केल्यास तुझ्यासह तुझ्या मालकांना गोळ्या घालू अशी धमकी देत होते. अनेकदा ते बांधकाम साईटवर येऊन बंद पाडण्याचा प्रयत्न करत होते. इतकेच नव्हे तर मोबाईलवर कॉल करुन काम बंद करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देत होते.
जानेवारी २०२४ रोजी संबंधित सातही आरोपी त्यांच्या बांधकाम साईटवर आले होते. त्यांनी काम सुरु ठेवायचे असल्यास एक कोटी द्यावे लागतील. नाहीतर त्यांना तिथे काम करता येणार नाही असे सांगितले. साईटवर काम सुरळीत सुरु राहावे यासाठी तक्रारदाराच्या मालकांनी त्यांना पाच रुपये दिले होते. त्यानंतर ते नियमित बांधकाम साईटवर येऊन पैशांची मागणी करत होते. सततच्या खंडणीसाठी येणार्या धमक्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत एक मिटींग घेतली होती. या मिटींगमध्ये त्यांच्यात २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे त्यांच्या मालकांनी त्यांना आणखीन पंधरा लाख रुपये दिले. मात्र ही रक्कम दिल्यानंतर त्यांचे खंडणीसाठी धमकी देण्याचे सत्र सुरु होते.
जानेवारी २०२६ रोजी मनदिपसह इतरांनी तिथे येऊन तक्रारदारांना पिस्तूलचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मनपाने रद्द केलेल्या रुमच्या मोबदल्यात तीन कोटीसह पाच फ्लॅटची मागणी केली होती. गेल्या तीन वर्षांत तक्रारदाराने त्यांच्यासोबत अनेकदा मिटींग घेऊन त्यांची समजूत काढून टप्याटप्याने २८ लाख ५० हजार रुपये खंडणी स्वरुपात दिले होते, तरीही त्यांच्याकडून त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरुन कॉल आणि मॅसेजद्वारे धमकी दिली जात होती. या धमक्यांना कंटाळून तक्रारदाराने मालकाच्या सांगण्यावरुन माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित सातही आरोपीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे, धमकावून २८ लाख ५० हजाराची खंडणीची रक्कम वसुल करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाने सोपविला होता. याच दरम्यान आरोपींनी तक्रारदारांना पुन्हा खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून माटुंगा सर्कल, इराणी हॉटेलजवळील कुलर ऍण्ड कंपनीसमोर बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे तिथे आनंद बिडलानी आणि रमेश चावरिया आले होते. यावेळी या दोघांनाही तक्रारदाराकडून दोन लाखांची खंडणीची रक्कम घेताना पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत मनदिपसिंह, जसविंदर, संदीप, गुरजीतसिंह आणि दिपकसिंह या पाचजणांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून मनदिप हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे बोलले जाते. या पाचही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.