व्यवसायात पार्टनरशीप ऑफर देऊन गंडा घालणारा गजाआड

लग्न जुळविणार्‍या संकेतस्थावरुन ओळख झालेल्या महिलेची फसवणुक

0

राजू परुळेकर
१८ जून २०२६
मुंबई, – लग्न जुळविणार्‍या एका खाजगी संकेतस्थळावरुन ओळख झालेल्या महिलेला भविष्यात व्यावसायिक योजनांची माहिती देऊन, या योजनेत पार्टनरशीप ऑफर करुन तिची सुमारे ४२ लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका भामट्याला चार महिन्यानंतर बोरिवली पोलिसांनी अटक केली. समर्थ प्रफुल्ल भाईंदरकर असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या काही महिन्यांत समर्थने प्रॉपटी गुंतवणुकीसाठी तक्रारदार महिलेकडून २२ लाख कॅश-ऑनलाईनद्वारे तसेच २२ लाखांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन तिची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

३९ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या वयोवृद्ध आई आणि मोठ्या बहिणीसोबत बोरिवली परिसरात राहते. सध्या ती पवईतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २०१७ साली तिने लग्नासाठी एका खाजगी लग्न जुळविणार्‍या संकेतस्थळावर स्वतची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर तिला अनेक मुलांचे प्रपोजल आले होते, त्यात समर्थ भाईंदरकर याचा समावेश होता. त्याने तिला रिक्वेस्ट पाठविल्यानंतर तिने त्याची रिक्वेस्ट स्विकारली होती. एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केल्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरु झाले होते. यावेळी तिला त्याने तो व्यावसायिक असून गोरेगाव येथील ओशिवरा, बालाजी एसआरए इमारतीमध्ये राहत सांगून इंटेरिअर्सचे कंत्राटासह व्हिसा आणि एअर तिकिट बुकिंग आणि ट्रॅव्हेल्स एजंटचे काम करतो. या कामासाठी त्याला दरमहा दोन ते पाच लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले होते.

फेब्रुवारी २०२५ रोजी ते दोघेही मालाड येथे पहिल्यांदा प्रत्यक्षात भेटले होते. या भेटीत त्याने तिला त्याच्या भविष्यातील विविध योजनांची माहिती दिली होती. त्यात त्याला विरार येथे थ्री बीएचकेचा बंगला घेऊन तो भाड्याने द्यायचा आहे. तसेच फुड कोर्ट आणि रेस्ट्रॉरंट सुरु करायचे आहे असे सांगून त्याला आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्याच्या बोलण्यावरुन तो प्रचंड महत्त्वाकांक्षी असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती त्याच्यासोबत बंगला पाहण्यासाठी एका एजंटकडे गेली होती. बंगल्याची पाहणी करुन त्याने तिला दोघांचे संयुक्त बॅक खाते सुरु करण्याचा सल्ला दिला होता. या संपूर्ण व्यवहाराला तिला पार्टनरशीप ऑफर केली होती. काही दिवसांनी त्याने तिच्या नावाने २२ लाखांची एक हुंडाई कार घेतली होती. त्यासाठी तिने बँकेतून कर्ज घेतले होते. या कर्जाचे ४४ हजार १६७ रुपयांचे चार हप्तने तिने भरले होते. या कारवर त्याने एका मित्राकडून कर्ज घेतले होते,

ही माहिती समजताच तिने कर्जाची रक्कम देऊन कार ताब्यात घेतली होती. काही दिवसांनी तिने कारची साडेसोळा लाखांना विक्री केली होती. याच दरम्यान समर्थ हा तिच्याकडे सतत प्रॉपटीसाठी पैशांची मागणी करत होता. फेब्रुवारी २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत तिने त्याला प्रॉपटी खरेदीसाठी टप्याटप्याने २२ लाख ९ हजार ९१६ कॅशसहीत ऑनलाईन तर २२ लाख १३ हजाराचे २४ तोळे सोने असे एकूण सुमारे ४४ लाख रुपये दिले होते. यावेळी त्याने कुठे प्रॉपटी खरेदी केली, तिने दिलेल्या पैशांचे काय केले याबाबत विचारणा केली असता तो तिला टाळू लागला होता. त्याने तिच्याशी संभाषण बंद केले होते.

कॉलसह मॅसेज करुनही तो तिला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे तिने त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांसह सोन्याच्या दागिन्यांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने तिला साडेसहा आणि साडेदहा लाखांचे दोन धनादेश दिले होते, ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. समर्थकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने बोरिवली पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच समर्थ हा पळून गेला होता. गेल्या चार महिन्यांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम असताना गेल्याच आठवड्यात त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने फसवणुकीच्या उद्देशाने तक्रारदार महिलेशी मैत्री केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page