कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने एकाच कुटुंबाची चार कोटीची फसवणुक

खाजगी कंपनीच्या पाच संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जून २०२६
मुंबई, – खार येथील निर्माणधीन इमारतीचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीत गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवून एकाच कुटुंबातील पाचजणांची सुमारे चार कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या पाचजणांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जगदीश अहुजा, वंदना अहुजा, शीतल अहुजा, गौतम अहुजा आणि अंजली अहुजा अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण अहुजा प्रॉपटी ऍण्ड असोशिएट्स कंपनीचे भागीदार-संचालक आहेत. या सर्व संचालकाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशोक सत्रामदास भागिया हे ७० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत माहीम परिसरात राहत असून ते ब्रोकर म्हणून परिचित आहेत. जुलै २०१० रोजी अहुजा प्रॉपटी ऍण्ड असोशिएट्सचे भागीदार जगदीश अहुजासह इतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या कंपनीकडून खार येथील लिंक रोडवर एक इमारतीचे प्रोजेक्ट सुरु आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा किंवा फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते. याबाबत त्यांच्यात काही मिटींग झाल्या होत्या. त्यात अहुजा कुटुबियांनी बोगस माहितीसह खोटी आश्‍वासने, आमिष दाखवून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते.

त्यांचा प्रपोजल चांगला वाटल्याने भागिया कुटुंबियांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अशोक भागिया यांनी १ कोटी ८६ लाख, त्यांची पत्नी रेश्मा भागिया हिने १ कोटी २५ लाख दोन मुले मुलगा आकाश व अक्षय भागिया यांनी प्रत्येकी ४२ लाख तर मुलगी अमृता भागियाने २० लाख तसेच कॅश स्वस्रुपात नऊ लाख असे एकूण ४ कोटी १५ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनी त्यांना २ कोटी ३८ लाख रुपये परतावा दिला. मात्र उर्वरित गुंतवणुकीवर त्यांना कुठलाही परतावा देण्यात आला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांना प्रत्यक्षात फ्लॅट उपलब्ध नसताना त्याचा आभास निर्माण करुन फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते.

त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांना ३ कोटी ९५ लाख रुपयांचे सतरा धनादेश दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. बँकेत धनादेश टाकले असता ते सर्व धनादेश न वटता परत आले होते. सर्व धनादेश बाऊन्स झाल्याने अशोक भागिया यांनी अहुजा कुटुंबियांविरुद्ध वांद्रे येथील लोकल कोर्टात एक खाजगी याचिका सादर केली होती. या याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीच्या नावाने अहुजा कुटुंबियांनी त्यांची ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ५२५ रुपयांची फसवणुक केली होती. ही रक्कम परत मिळण्याची शक्यता नसल्याने अशोक भागिया यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जगदीश अहुजा, वंदना अहुजा, शीतल अहुजा, गौतम अहुजा आणि अंमली अहुजा या पाचही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांच पोलिसांकडून तपास सुरु असून अहुजा कुटुंबातील पाचही सदस्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या आरोपींनी प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी इतरांना कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page