पतीकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला पत्नीची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जून २०२६
मुंबई, – अनैतिक संबंधामुळे पतीकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून मनिषा प्रदीप गायकवाड नावाच्या एका महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर एक महिन्यानंतर आरोपी पती प्रदीप रघुनाथ गायकवाड याच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत प्रदीपला मंगळवारी पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रदीपची पत्नी मनिषा हिने तिच्या लग्नाच्या नवव्या वाढदिवशीच गळफास घेऊन जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

नंदा धोंडीराम जाधव ही महिला नालासोपारा येथे तिच्या पती आणि मुलांसोबत राहते. तिचे पती चालक तर एक मुलगा कुरिअरचे काम करतो. २०१७ साली तिची मुलगी मनिषा हिचे प्रदीप गायकवाडसोबत लग्न झाले होतेे. लग्नानंतर मनिषा ही गोरेगाव येथील दिडोंशीपाडा, कोयनानगर, साईबाबा चाळीत राहण्यासाठी आली होती. त्यांना सात आणि चार वषा्रंचे दोन मुले आहेत. प्रदीप हा मूळचा सातारा, महाबळेश्‍वरचा रहिवाशी असून सध्या चालक म्हणून काम करतो. लग्नानंतर काही महिन्यांत प्रदीप हा क्षुल्लक घरगुती कारणावरुन मनिषाचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. याबाबत तिने तिच्या कुटुंबियांना काहीच सांगितले नव्हते. त्याचाच प्रदीप सतत गैरफायदा घेत होता.

२०२२ साली त्याने दारुच्या नशेत तिच्या वडिलांना कॉल करुन शिवीगाळ करुन त्यांच्या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले होते. याबाबत वडिलांनी मनिषाकडे विचारणा केली असता तिने प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही प्रदीप हा तिच्याह दोन्ही मुलांना मारहाण करत होता. अनेकदा ती आजारी असताना प्रदीप तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. सतत तिच्या चुका दाखवून तिचा मानसिक शोषण करत होता. काही दिवसांपूर्वीच मनिषाला प्रदीपचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समजली होती. तिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध असून ते दोघेही अनेकदा हॉटेलमध्ये भेटताता, त्याच्या बाईकवरुन फिरतात.

इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच तिने या दोघांना अश्‍लील चाळे करताना पाहिले होते. तिने त्यांच्या अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून त्याने तिला बेदम मारहाण केली होती. त्याला तिच्यासोबत नव्हे तर त्याच्या प्रेयसीसोबत राहायचे आहे असे तो सांगत होता. त्याने तिला धमकावून हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. काही महिन्यांपूर्वी तो तिला घेऊन त्यांच्या गावी गेला होता. हा प्रकार मनिषाने तिच्या आजीला सांगितला होता, मात्र ती माहिती तिच्या घरच्यांना सांगू नकोस अशी विनंती केली होती.

१७ मे २०२६ रोजी त्याच्या लग्नाचा नववा वाढदिवस होता, त्या संपूर्ण दिवशी त्याने मनिषाशी विनाकारण वाद घालून तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. प्रदीपकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला मनिषा कंटाळून गेली होती. त्यातून तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. त्यामुळे १७ मेला लग्नाच्या वाढदिवसाच्या रात्री साडेनऊ वाजता तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार प्रदीपला समजताच त्याने तिला मालाडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मनिषाने आत्महत्या केल्याचा त्याच्या चेहर्‍यावर अजिबात दुखं नव्हते.

घडलेला प्रकारानंतर त्याने जाधव कुटुंबियांना मनिषा संपली इतकीच माहिती सांगून फोन कट केला होता. ही माहिती समजताच जाधव कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या घटनेनंतर ते सर्वजण गोरेगाव येथे आले होते. स्थानिक रहिवाशांच्या चौकशीतून मनिषाच्या आत्महत्येला प्रदीप हाच जबाबदार असल्याचे उघडकीस आले. अनैतिक संबंधामुळे तो तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्याला कंटाळून मनिषाने आत्महत्या केली होती.

त्यामुळे तिची आई नंदा जाधव हिने दिलेल्या तक्रारीवरुन दिडोंशी पोलिसांनी प्रदीपविरुद्ध पत्नीचा मानसिक व शारिरीक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page