अंधेरी-आझादनगर मेट्रो रेल्वे ट्रकवर तरुणाचा वॉक

घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक सेवेवर परिणाम

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जून २०२६
मुंबई, – अंधेरी-आझाद नगर मेट्रो रेल्वे ट्रकवर एक तरुण चालत गेल्याने घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. जवळपास अठरा मिनिटे वाहतूक सेवा विस्कळी झाल्याने या तरुणाविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात मेट्रो रेल्वे कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनंदन अशोक सुळे असे या २४ वर्षीय तरुणाचे नाव असून त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे तपासात उघडकीस आले. वॉशरुमबाबत सुरक्षारक्षकांनी काहीच माहिती न दिल्याने तो मेट्रो ट्रकवरुन चालत निघाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

आकाश दिपक कंडारे हे ठाण्यातील दिवा परिसरातील रहिवाशी असून एका खाजगी सुरक्षारक्षक कंपनीत कामाला आहे. त्यांची सध्या नेमणूक मुंबई मेट्रो वनच्या अंधेरी स्थानकात आहे. बुधवारी १७ जूनला दुपारी ते त्यांचे सहकारी शिवम पांडेसोबत कर्तव्यावर हजर होते. पावणेचार वाजता त्यांना कंट्रोल रुमच्या आदित्य सुरेंद्र परुळेकर यांनी वॉकीटॉकीवरुन कॉलद्वारे एक तरुण मेट्रो ट्रकवर उतरुन जात असल्याने मेट्रो ट्रेन थांबविण्यात आली आहे. त्याच्यावर तातडीने कारवाई करा असा संदेश प्राप्त झाला होता. या संदेशानंतर त्यांच्या सहकार्‍यासोबत आझाद नगर मेट्रोच्या दिशेने निघाले होते.

यावेळी त्यांना अभिनंदन सुळे नावाचा २४ वर्षांचा तरुण आझाद नगर मेट्रोच्या दिशेने पायी जाताना दिसून आला. रेल्वे रुळावर अभिनंदन चालत गेल्याने मेट्रोची वर्सोवा-घाटकोपर सेवेवर अठरा ते वीस मिनिट परिणाम झाला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर अंधेरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान अभिनंदन हा मूळचा सोलापूरच्या माळशिरस, सुळेवाडीचा रहिवाशी असून सध्या तो वसईच्या लहुपाडा, रानगाव रोड, देवाळे शाळेजवळील परिसरात राहतो. त्याची मानसिक स्थिती ठिक नसून त्याच्यावर उपचार सुरु आहे. तो घाटकोपर येथील एका दुकानात कामाला आहे.

अंधेरी येथून तो घाटकोपर आणि नंतर त्याच्या सोलापूर येथील गावी जाणार होते. त्यासाठी तो वसई येथून अंधेरी रेल्वे स्थानकात आला. तिथे त्याने सुरक्षारक्षकांना वॉशरुमविषयी माहिती विचारली, मात्र सुरक्षारक्षकाने त्याला काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे तो मेट्रोच्या ट्रकवर उतरुन आझाद नगर स्थानकाच्या दिशेने निघून गेला होता. ही माहिती नंतर अभिनंदनच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून अभिनंदनची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे उघडकीस आले. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याच्या गोळ्या संपल्या होत्या. या गोळ्या घेण्यासाठी तो सोलापूरला जाणार होता असे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

याप्रकरणी रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध पोलिसांनी मेट्रो रेल्वे कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नोटीस देऊन त्याला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणजीत गुंडारे हे करत असून त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page