बोरिवलीत तरुणाची अल्पवयीन मुलाकडून तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या
बाईक पार्कवरुन झालेल्या वादातून आईला मारहाण केल्याचा राग होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मार्च 2026
मुंबई, – बोरिवली येथे राहणार्या भरत संजय आढाव या तरुणाची त्याच्याच शेजारी राहणार्या अल्पवयीन मुलाने तिक्ष्ण हत्यााराने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन सतरा वर्षांच्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. रंगपंचमीला बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या वादातून भरतने आरोपी मुलासह त्याच्या आईला मारहाण केली होती. त्याच्याच रागातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी सव्वाअकरा ते साडेअकराच्या सुमारास बोरिवलीतील न्यू लिंक रोड, गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक पाचमध्ये घडली. याच परिसरात भरत आढाव हा राहत होता. तो एका मंडप डेकोरेटरकडे कामाला होता. त्याच्याच शेजारी आरोपी मुलगा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. रंगपंचमीला भरतने त्याची बाईक त्याच्या घरासमोरच पार्क केली होती. याच कारणावरुन त्याचे भरतसोबत शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून भरतने या मुलासह त्याच्या आईला बेदम मारहाण केली होती.
त्याचा त्याच्या मनात राग होता. गुरुवारी सकाळी भरत तेथील सार्वजनिक शौचालयाच्या दिशेने जात होता. यावेळी तिथे आरोपी मुलगा आला आणि त्याने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने त्याच्या गळ्यासह शरीरावर वार केले होते. त्यात भरत हा गंभीररीत्या जखमी झाला होता. रक्तबंबाळ झालेल्या भरतला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
स्थानिक रहिवाशांच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीला काही तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत भरतने त्याच्या आईला मारहाण केल्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने भरतची हत्या केल्याची कबुलीी दिली. आरोपी मुलगा सतरा वर्षांचा अल्पवयीन असल्याने त्याला सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.