मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मार्च 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्या बाईकची इलेक्ट्रीक पोलला धडक लागून झालेल्या अपघातात आकाश चंद्रकांत आंग्रे या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळेस आकाशने मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशन करुन भरवेगात बाईक चालविणे त्याच्या जिवावर बेतल्याचे बोलले जाते. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी आकाशविरुद्ध मद्यप्राशन बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात बुधवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता कुर्ला येथील एससीएलआर ब्रिजवरील डेअरी रोड येथून ब्रिजच्या चढणीच्या उत्तर वाहिनीवर झाला. अजय चंद्रकांत आग्रे हा 23 वर्षांचा तरुण चेंबूरच्या निलगिरी चाळीत राहत असून सध्या कॉलेजमध्ये शिकतो. आकाश हा त्याचा मोठा भाऊ असून तो चालक म्हणून काम करत होता. 12 मार्चला रात्री उशिरा साडेबारा वाजेपयंत आकाश हा घरी आला नव्हता. त्यामुळे त्याची पत्नी तेजल आग्रे हिने त्याच्या मोबाईलवर कॉल केला होता. यावेळी एका व्यक्तीने कॉल घेऊन आकाशचा अपघात झाला असून त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती दिली होती. या माहितीनंतर आग्रे कुटुंबिय राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
चौकशीदरम्यान आकाश हा बुधवारी रात्री दहा वाजता कुर्ला येथे त्याच्या एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेला होता. या पार्टीत त्याने मित्रांसोबत मद्यप्राशन केले होते. नंतर तो कोणालाही काहीही न सांगता तेथून निघून गेला होता. मद्यप्राशन करुन तो त्याच्या बाईकवरुन घराच्या दिशेने जात होता. रात्री साडेबारा वाजता ही बाईक कुर्ला येथील नेहरुनगर, गणेश हॉलच्या मागील रस्त्यावरुन जात असताना त्याचा बाईकवरील नियंत्रण सुटले. यावेळी त्याने डेअरी रोड येथून ब्रिजच्या चढणीवरील इलेक्ट्रीक पोलला जोरात धडक दिली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या आकाशला पोलिसांनी तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मद्यप्राशन करुन भरवेगात बाईक चालवून, बाईकचे नियंत्रण सुटल्याने त्याने इलेक्ट्रीक पोलला जोरात धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस तोच कारणीभूत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी अजय आग्रे याची पोलिसांनी जबानी नोंदविण्यात आली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकाशविरुद्ध मद्यप्राशन बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.