व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने पोलीस शिपाई महिलेची फसवणुक
सहकारी शिपाई महिलेसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 मार्च 2026
मुंबई, – बहिणीच्या होलसेल साडीच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास दोन ते तीन महिन्यांत गुंतवणुक रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून रेल्वे पोलीस दलातील एका पोलीस शिपाई महिलेची तिच्याच सहकारी पोलीस शिपाई महिलेने सुमारे साडेपाच लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. स्नेहा सत्यवान कदम, साक्षी विशाल खांडेकर ऊर्फ आरती आणि मायकर अशोक देवकुळे अशी या तिघांची नावे आहेत. यातील स्नेहा ही महिला पोलीस शिपाई असून सध्या ती वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. साक्षी ऊर्फ आरती ही तिची बहिण नसताना तिने ती तिची बहिण असल्याची बतावणी केली होती. साक्षीसह तिच्या पतीने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
राजश्री मच्छिंद्र काटे ही महिला विक्रोळी येथे राहत असून मुंबई रेल्वे पोलीस दलात महिला पोलीस शिपाई म्हणून काम करते. सध्या तिची नेमणूक घाटकोपर येथील लोहमार्ग मुख्यालयात आहे. पोलीस प्रशिक्षणादरम्यान घाटकोपर लोहमार्ग मुख्यालयात 50 महिला उपस्थित होत्या. या सर्वांना नंतर दहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. याच दरम्यान तिची पोलीस शिपाई स्नेहा कदम हिच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्या दोघीही चांगल्या मैत्रिण झाल्या होत्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्नेहाला वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे येथे पाठविण्यात आले होते. सप्टेंबर 2024 त्या दोघीही सायन येथे पोलीस बंदोबस्तासाठी एकत्र आले होते.
बंदोबस्तानंतर ती स्नेहासोबत तिच्या विक्रोळीतील घरी गेली होती. यावेळी तिने तिची बहिण साक्षी खांडेकर ही फॅक्टरीतून होलसेलमध्ये साडी घेत असून या साड्यांची विक्री करते. दिवाळी, नवरात्रोत्सवासह इतर सणांमध्ये साड्यांना प्रचंड मागणी असल्याने तिच्या साड्यांना प्रचंड मागणी असते. तिला तिच्या व्यवसायात मदत केल्यास तिच्याकडून तिला चांगला परतावा मिळेल. दोन ते तीन महिन्यांत तिने गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखविले होते. स्नेहा ही पोलीस शिपाई आणि तिची मैत्रिण असल्याने तिने तिच्या बहिणीच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याबाबत तिने तिच्या पतीशी सविस्तर चर्चा केली होती. त्याने तिला गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता.
दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडून तिने तिच्याकडे 25 सप्टेंबर ते 28 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत टप्याटप्याने सुमारे साडेपाच लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. ही रक्कम तिने स्नेहासह साक्षी आणि मायकर देवकुळे यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत तिने गुंतवणुक रक्कम दुप्पट करुन दिली नाही. पैशांची मागणी केली असता विक्री झालेल्या साड्यांचे पेमेंट आले नाही असे सांगत होती. याच दरम्यान तिला स्नेहाने तिची बहिण सांगत असलेल्या साक्षी खांडेकर, तिचा पती विशाल खांडेकर आणि मिनाक्षी गणेश कांबळी यांच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदाराची वीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजली होती.
या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे. हा प्रकार लक्षात येताच राजश्री काटे हिने घडलेला प्रकार विक्रोळी पोलिसांना सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्नेहा कदम, साक्षी ऊर्फ आरती खांडेकर आणि मायकर देवकुळे या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.