मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 मार्च 2026
मुंबई, – सुमारे 67 लाख रुपयांचे शुद्ध सोने घेऊन एका कारागिराने पलायन केल्याची घटना लोअर परेल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुनिल उत्तम दंडापत या कारागिराविरुद्ध एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या 400 ग्रॅम शुद्ध सोन्याचा सुनिलने अपहार केल्याचा आरोप आहे. तो त्याच्या कोलकाता येथील गावी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अब्दुल रेहमान मोतीयर रेहमान शेख हे व्यापारी असून सध्या ते जोगेश्वरी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतत. त्यांची झव्हेरी बाजार येथे गोल्ड अर्टिझम नावाची कंपनी असून ही कंपनी सोन्याचे दागिने बनवून विविध ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री करते. कंपनीचे लोअर परेल येथील शहा अॅण्ड नाहर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सोन्याचे दागिने बनविण्याचे एक युनिट आहे. याच युनिटमध्ये सुनिल हा गेल्या दिड वर्षांपासून कारागिर म्हणून काम करत होता. अनेकदा युनिटचे मॅनेजर अल्लाउद्दीन मल्लिक हे त्याला शुद्ध सोने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी देत होते. दागिने बनवून घट सोडून उर्वरित दागिने तो त्यांना परत करत होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता.
जानेवारी 2025 रोजी गोरेगाव येथील सोन्याच्या दागिन्यांचे एक प्रदर्शन होते. त्यासाठी सुनिलला 250 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी देण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे त्याने दागिने बनवून दिले, मात्र त्याच्याकडे आधीचे 160 ग्रॅम शुद्ध सोने होते. त्याचा त्याने हिशोब दिला नव्हता. काही दिवसांनी त्याने साठ ग्रॅम सोने परत केले होते. जानेवारी 2026 रोजी त्याला 780 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड देण्यात आली होती. त्याचे त्याने दागिने बनवून दिले होते. मात्र उर्वरित तीनशे ग्रॅम वजनाचे दागिने बनवून दिले नाही. आधीचे शंभर आणि आताचे तीनशे असे 67 लाख रुपयांचे 400 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोन्याचा त्याच्याकडे हिशोब येत नव्हता.
वारंवार विचारणा करुनही त्याने सोन्याचे दागिने बनवून दिले नाही. 67 लाखांचे शुद्ध सोन्याचा अपहार करुन सुनिल हा पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच अबदुल रेहमान शेख यांनी घडलेला प्रकार एन. एम जोशी मार्ग पोलिसांना सांगून सुनिलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 67 लाखांच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन कंपनीचे मालक अब्दुल रेहमान शेख यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
सुनिल हा मूळचा कोलकाता येथील मोदीनीपूर, चंद्रकोनाचा रहिवाशी असून सध्या दिवा येथील साबेगावात राहत होता. फसवणुकीनंतर तो त्याच्या कोलकाता येथील गावी पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.