मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2026
मुंबई, – सोलापूर येथील कार्यालयात डिलीव्हरीसाठी दिलेल्या सुमारे 39 लाख रुपयांच्या चांदीचा अपहार करुन नोकराने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अभिषेक भजनसिंह ठाकूर या 20 वर्षांच्या आरोपी नोकराविरुद्ध व्ही. पी रोड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक हा गेल्या दिड महिन्यांपासून फरार असल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हरेंद्रसिंग रनसिंग सिकारवार हे व्यावसायिक असून ते काळबादेवी परिसरात राहतात. काळबादेवी येथील कंसारा चाळ, तिसरा मजल्यावर त्यांचे राधाकृष्ण आंगडिया नावाचे एक कुरिअर सर्व्हिसचे कार्यालय आहे. याच कार्यालयात अभिषेक ठाकूर हा काम करत होता. दिवसभर काम करुन तो कार्यालयात झोपत होता. 29 जानेवारी 2026 रोजी हरेंद्रसिंगने अभिषेकला 38 लाख रुपयांचे 10 किलो 104 ग्रॅम वजनाचे चांदी दिले होते. ते चांदी त्याला सोलापूर येथील कार्यालयात जमा कराचे होते.
ठरल्याप्रमाणे 29 जानेवारीला तो चांदी घेऊन निघून गेला. मात्र दोन दिवस उलटूनही तो सोलापूर येथील कार्यालयात गेला नव्हता. हा प्रकार समजताच हरेंद्रसिंग यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क झाला नाही. डिलीव्हरीसाठी दिलेले 38 लाखांचे चांदी घेऊन अभिषेक पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिषेकविरुद्ध चांदीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी तिथे पोलीस टिम पाठविण्यात येणार आहे.