चरित्र्याच्या संशयावरुन लोकलसमोर ढकळून पत्नीची हत्या
सुरतला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पतीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मार्च 2026
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन मुलुंड रेल्वे स्थानकात फलाटवर येणार्या लोकलसमोर ढकलून एका महिलेची तिच्याच पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुष्पा राजू गुप्ता असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी पती राजू अवधराम गुप्ता (42) याला कुर्ला रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. हत्येनंतर राजू हा सुरतला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 20 तासांत त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पुष्पाचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्यावरुन त्यांच्यात खटके उडत होते, त्यातून त्याने ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले.
राजू हा मूळचा उत्तरप्रदेशच्या देवरिया, भलुअनीच्या टेनुआचा रहिवाशी असून सध्या मुलुंडच्या गोशाळा रोड, रामगढ परिसरात राहतो. पुष्पा ही त्याची पत्नी असून ती तिच्या गावी गेली होती. शनिवारी 14 मार्चला तिचा भाऊ कमलेशकुमार शामदेव गुप्ता हा पुष्पा आणि भाच्यासोबत उत्तरप्रदेशातून मुंबईत आले होते. मुलुंड येथे घरी आल्यानंतर राजूचे पुष्पासोबत क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या वाद इतका विकोपास गेला की, रागाच्या भरात पुष्पाने राजूच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान कमलेशकुमार याचे वॉलेट घरी राहिल्याने तो पुन्हा घरी गेला होता. त्यानंतर पुष्पा, राजू आणि त्यांचा मुलगा शुभांशू ऊर्फ विराट असे तिघेही मुलुंड रेल्वे स्थानकात आले होते.
फलाट क्रमांक एकवर लोकलची वाट पाहत असताना राजूने पुष्पाला फलाटवर येणार्या लोकलसमोरच धक्का दिला होता. लोकलच्या धडकेने पुष्पाचा मृत्यू झाला होता. तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच त्याने तिला लोकलसमोर धक्का दिला होता. या घटनेनंतर तो पळून गेला होता. ही माहिती प्राप्त होताच कुर्ला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कमलेशकुमार गुप्ता याच्या तक्रारीवरुन कुर्ला रेल्वे पोलिसांनी राजू गुप्ता याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव आणि विजय खेडकर यांना संमातर तपास करण्याचे आदेश देताना आरोपी पतीच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पळून गेलेल्या राजूचा शोध सुरु केला होता. जवळपास 150 हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर राजू हा आधी ठाण्यात गेला, तेथून तो सीएसएमटी लोकलने दादरला आला. दादर येथून बोरिवली आणि विरारच्या दिशेने ाजणार्या लोकलमध्ये चढून निघून गेल्याचे दिसून आले. मुंबईतून तो गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत होता. अटकेच्या भीतीने त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. विरार रेल्वे स्थानकातून तो सुरतला जाणार्या एक्सप्रेसने निघाला होता.
यावेळी गुन्हे शाखेच्या एसटीएफसह सुरत गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विनोद गुरखा आणि प्रविण शेलार यांनी राजूला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्याला पुष्पाचे मुलुंड परिसरात राहणार्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरुन त्याचे पत्नीसोबत नेहमीच खटके उडत होते. त्यामुळे त्याने पुष्पाची हत्या करण्याच्या उद्देशाने तिला लोकलसमोर ढकळल्याची कबुली दिली. हत्येनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू सातपुते, माधुरी घाडगे, गणपत सुळे, मंगेश खाडे (तांत्रिक शाखा), पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कालापाड, राजेश भंडाळे, गजानन शेडगे, आनंद जहॉगीरदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव चव्हाण, मिनाक्षी गोहिल, पोलीस हवालदार प्रविण घार्गे, सुनील कुंभार, प्रशांत रेडेकर, वैभव शिंदे, वैभव जाधव, विकास रासकर, सतीश फडके, मयुर पाटील, अमरसिंग वळवी, राकेश भामरे, सतीश धायगुडे, सागर हिंगे, कुणाल तावडे, सिंकदर तडवी, सतीश कांबळे, सुनिल मागाडे, पोलीस अंमलदार स्वप्नील नागरे, आकाश सोनावणे, अक्षय देसाई, अजहर पटे, रुपेश पाटील, कुणाल वाल्डे यांनी रेल्वे स्थानकासह परिसरातील 150 हून अधिक तपासून आरोपीचा शोध घेतला. याकामी तांत्रिक शाखेचे पोलीस हवालदार विक्रम चावरेकर, पोलीस अंमलदार अमो अहिनवे यांनी मदत केली तर गुन्ह्यांच्या तपासकामी सुरतच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विनोद गुरखा, पोलीस हवालदार प्रविण शेलार यांनी आरोपीला पकडण्यासाठी संबंधित पोलीस पथकाला मदत केली.