घरखर्चाच्या पैशांवरुन होणार्या वादातून पत्नीची पतीकडून हत्या
हल्ल्यात दोनजण जखमी तर आरोपी पतीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मार्च 2026
मुंबई, – घरखर्चावरुन होणार्या वादातून माहेरी आलेल्या अफसाना मोहम्मद साबीर अन्सारी या महिलेची तिच्याच पतीने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात फईम अहमद अब्दुल रहिम अन्सारी आणि सबीना अन्सारी असे दोनजण जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येसह हत्येचा प्रयत्न व अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मोहम्मद साबीर अन्सारी या 44 वर्षीय आरोपी पतीला मालवणी पोलिसांनी अटक केली. रविवारी घडलेल्या हत्येसह हत्येच्या प्रयत्नाच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता मालाडच्या मालवणीतील भाजी मार्केटशेजारील प्लॉट क्रमांक 48, 50 क्रमांकाच्या मशिदीजवळ घडली. याच परिसरातील रुम क्रमांक अकरामध्ये फईम अन्सारी हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. अफसाना ही त्यांची बहिण असून त्याचे मोहम्मद साबीरशी लग्न झाले होते. मात्र तो तिला घरखर्चासाठी पैसे देत नव्हता. याच कारणावरुन या दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. त्यातून मोहम्मद साबीर हा अफसाना हिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण करत होता. त्याच्याकडून होणार्या छळाला कंटाळून ती तिच्या माहेरी निघून आली होती.
रविवारी रात्री साडेदहा वाजता मोहम्मद साबीर हा त्याचा मेहुणा फईम अन्सारीच्या घरी आला होता. यावेळी त्याचे फईमसोबत कौटुंबिक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर त्याने त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्याने अफसानाला घरी नेण्याचा प्रयत्न केला. घरखर्चासाठी पैसे देत नसल्याचा आरोप तिने त्याच्यासोबत घरी जाण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालीद होती. यावेळी त्याने किचनच्या कट्ट्यावरील चाकूने तिच्यावर चाकूने वार केले होते. यावेळी फईम आणि त्याची भाची सबीना हे दोघेही तिला वाचविण्यासाठी गेले होते.
त्याचा राग आल्याने त्याने त्यांच्यावरही चाकूने वार केले होते. या हल्ल्यात ते तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अचानक सुरु झालेल्या आरडाओरडानंतर स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेतली होती. जखमी तिघांनाही स्थानिक रहिवाशांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरु असताना अफसाना हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर फईम आणि सबीनावर उपचार करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी फईम अन्सारीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याचा आरोपी मेहुणा मोहम्मद साबीर अन्सारीविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून गुन्ह्यांतील चाकूने पोलिसांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्यांचा पोलीस निरीक्षक बिले, पोलीस उपनिरीक्षक धुमाळ हे तपास करत आहेत.