एमटीएनएल केबल वायर चोरी करणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
मुलुंड येथे आलेल्या नऊजणांना बारा लाखांच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2026
मुंबई, – रात्रीच्या वेळेस एमटीएनएल केबल वायर चोरी करणार्या एका आंतरराज्य टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नेहाल वाजुउद्दीन सय्यद, मोहम्मद इसरुल मोहम्मद गयास कुलीहा, इक्राम मोहम्मद अझहर, अभिषेक राजकुमार महातो, आहद मोहम्मद शबराती आलम, मोहम्मद राजा मोहम्मद हासिम अन्सारी, मोहम्मद मुर्शिद मोहम्मद अजीब अन्सारी, संजय दिनेश महातो आणि संजयकुमार शिवजी शाह अशी या नऊजणांची नावे असून ते सर्वजण उत्तरप्रदेश, बिहार आणि दिल्लीचे रहिवाशी आहेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे बारा लाख रुपयांचे एका कारसह दरोड्यातील लागणारे साहित्य जप्त केले आहेत. अटकेनंतर या सर्वांना मुलुंड येथील लोकल कोर्टाने शुक्रवार 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एमटीएलएलचे वायर चोरी करणारी ही टोळी असून या टोळीच्या अटकेने अशाच काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी सांगितले.
मुंबई शहरात गेल्या काही महानगर टेलिफोन निगम लिमिटेच्या केबल वायर चोरी करणार्या काही टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. या टोळीने ते एमटीएनएलचे कर्मचारी असल्याचे सांगून रात्रीच्या वेळेस लाखो रुपयांच्या केबल वायरची चोरी केली होती. त्यामुळे अशा आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून स्थानिक पोलिसांना देण्यात आले होते. ही मोहीम सुरु सआतना उत्तरप्रदेशातील केबल वायर चोरी करणारी एक टोळी मुलुंड परिसरात परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार, मनोज पाटील, पोलीस हवालदार बाविस्कर, घुगे, पोलीस शिपाई भोर, ढेबे, ठाकूर, पाटील यांनी मुलुंडच्या एलबीएस रोड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी रात्री उशिरा तिथे एका वाहनातून संबंधित आरोपी आले होते, या सर्वांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी एक आयशर कार, एक हायड्रो क्रेन, दोन लोखंडी तलवारी, एक चाकू, दोन लोखंडी हातोडे, फायबर मूळ असलेल चार पटाशी, लोखंडी पहार, दहा एक्सा ब्लेड, एक्सा ब्लेडचे दोन हॅण्डल, लाकडी दांडा असलेले टिकाव, एक लोखंडी छन्नी, वर्तुळाकार रबरी पॅकिंग, पाच पिवळ्या रंगाचे प्लास्टिक हेल्मेट, लाल रंगाचे दोन रिफ्लेक्ट जॅकेट, दोन निळ्या रंगाचे कटर, लोखंडी वायररोप, दहा ट्रॉफिक सेफ्टी कोन, काळ्या रंगाची सहा फुट व नऊ फुट लांबीची एमटीएनएलची वायर असा 12 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत त्यांनी ते तिथे एमटीएनएल केबल वायर चोरीसाठी आले होते.
चोरीनंतर ते सर्वजण उत्तरप्रदेशात पळून जाणार होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर संबंधित सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अलीकडेच आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमटीएनएलच्या केबल वायरची चोरी केल्याचे बोलले जाते. त्यांच्याविरुद्ध उत्तरप्रदेशासह इतर राज्यात काही गुन्हे दाखल आहे. त्यामुळे मुलुंड पोलिसांनी संबंधित सर्व राज्यांना पत्रव्यवहार करुन त्यांच्याविषयी माहिती काढण्यास सुरुवात केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी सांगितले. त्यांच्या अटकेने अशाच अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.