डिजीटल अरेस्टच्या नावाने वयोवृद्धाची 76 लाखांची फसवणुक

सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2026
मुंबई, – डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका वयोवृद्धाची 76 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी जुगल कश्यपभाई मानेक नावाच्या एका 25 वर्षांच्या आरोपी तरुणाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. जुगल हा गुजरातच्या अहमदाबादचा रहिवाशी असून त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा झाली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

योगेश भोजा श्रीयान हे 74 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार दहिसर येथे राहत असून ते सध्या सेवानिवृत्त आहेत. 27 जानेवारीला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना बंगलोरच्या राजेंद्रनगर पोलीस ठाण्याचे अजय पाटील नाव सांगणार्‍या एका व्यक्तीने कॉल केला होता. त्यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल असे सांगितले. मात्र त्यांनी ते वयोवृद्ध असल्याने चौकशीसाठी येऊ शकत नाही असे सांगितले. त्यामुळे त्याने त्यांची फोनवरुन चौकशी सुरु केली होती. त्यानंतर त्यांच्याशी नवजोत सिम्मी नाव सांगणार्‍या एका सीबीआय अधिकारी म्हणून बतावणी करणार्‍या महिलेने संभाषण केले होते.

त्यांच्याविरुद्ध एका महिलेने तक्रार केल होती. त्यांच्या मोबाईलवरुन तिच्या मुलीला शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत त्यांना अटक होणार असल्याचे सांगितले. तिने त्यांना आयकर विभागासह भारतीय रिझर्व्ह बँकेचा शिक्का असलेले काही कागदपत्रे पाठविले होते. त्यांनी तपासात सहकार्य करावे, चौकशीबाबत कोणाशी बोलू नये, त्यांनी उल्लघंन केल्यास त्यांना सात वर्षांचा कारावास तसेच 58 लाख 86 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा होईल अशी भीती घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांना तपासासाठी काही पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते.

चौकशीसह अटकेच्या भीतीने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात टप्याटप्याने 76 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र चौकशीनंतर पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी पैसे पाठविले नाही. नंतर त्यांची साधी चौकशीही केली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास केला होता.

तपासात ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यातील काही रक्कम जुगल मानेक या तरुणाच्या बँक खात्यात जमा झाले होते. जुगल हा गुजरातच्या अहमदाबादचा रहिवाशी असल्याने प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकाने त्याला अहमदाबाद येथून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँकेत खाते उघडून दिले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम त्याने सायबर ठगांना पाठविली होती. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळ कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही आरोपीचे नाव समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page