दारु पिण्यावरुन पत्नीची लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या
वेळीच औषधोपचार न मिळाल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मार्च 2026
मुंबई, – दारु पिण्यावरुन झालेल्या वादातून कविता रमेश लोदी ऊर्फ कविता महेश वाड या 29 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. वेळीच औषधोपचार न मिळाल्याने कविताचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचे संपूर्ण शरीर काळे-निळे पडल्याने तिला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आरोपी पती महेश नारायण वाड याच्याविरुद्ध वडाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर महेश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शुभम रमेश लोदी हा तरुण मूळचा रायगडच्या मुरुड, एकदराचा रहिवाशी असून सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत नवी मुंबईतील नेरुळ, सेक्टर दहामध्ये राहतो. कविता ही त्याची मोठी बहिण असून तिचे महेश वाडशी लग्न झाले होते. ते दोघेही वडाळ्यातील गणेश मंदिराजवळील गणेशनगरात राहत होते. महेशला दारु पिण्याचे व्यसन होते, याच कारणावरुन महेश आणि कविता यांच्यात नेहमी खटके उडत होते. शुक्रवारी 13 मार्चला दुपारी दोन वाजता महेश हा नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन घरी आला होता. यावेळ त्याचे कवितासोबत भांडण झाले होते.
या भांडणानंतर रागाच्या भरात त्याने तिला हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. तसेच मोबाईल तिच्या चेहर्यावर जोरात फेंकून मारला होता. त्यात तिला गंभीर दुखापत झाली होती. तिची दुखापत गंभीर असताना त्याने तिला वेळीच औषधोपचारासाठी नेले नव्हते. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती. घरात बेशुद्ध पडल्यानंतर तिला तातडीने केईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या अहवालात तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यातून तिचा संपूर्ण शरीर काळे-निळे पडले होते. तिची दुखापत गंभीर होती, त्यामुळे तिला तातडीने औषधोपचाराची गरज असताना तिला उपचार मिळाले नव्हते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.
हा अहवाल पोलिसांना प्राप्त होताच शुभम लोदीने महेश लाडविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या बहिणीची महेशची लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आरोपी पतीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.