75 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल
बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन वयोवृद्धाची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मार्च 2026
मुंबई, – सुमारे 75 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका मायलेकाविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हर्षा राजेंद्र शहा आणि दिप राजेंद्र शहा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांवर बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन एका वयोवृद्ध तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्यांची चौकशी होणार असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
70 वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार प्रकाश संभाजी खवणेकर हे त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला येथे राहतात. ते बीपीएसमधून तर त्यांची पत्नी निलाक्षी ही मंत्रालयीन सेवेतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर आलेल्या पैशांतून त्यांनी प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. जून 2018 साली त्यांना ऑलिव्ह रेसीडेन्सी या बांधकाम इमारतीबाबत माहिती समजली होती. याच दरम्यान त्यांनी कंपनीचे मालक राजेंद्र शहा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांना त्यांच्या कंपनीकडे सुरु असलेल्या प्रोजेक्टची माहती दिली होती. त्यात कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात ऑलिव्ह शेरलाईन अपार्टमेंट या निर्माणधीन इमारतीचा समावेश होता.
याच इमारतीमध्ये त्यांनी दहाव्या मजल्यावर एक फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी त्यांना फ्लॅटचे सत्तर लाख व रजिस्ट्रेशनसाठी पाच लाख रुपये असे 75 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले होते. या पेमेंटनंतर त्यांना दहाव्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 1004 देण्याचे ठरले होते. ऑक्टोंबर 2019 रोजी राजेंद्र शहा यांचे निधन झाले होते. त्यामुळे कंपनीचा सर्व कारभार त्यांची पत्नी हर्षा शहा, मुलगा दिप शहा यांच्याकडे आला होता. राजेंद्र शहाच्या निधनानंतर त्यांनी दिपची भेट घेऊन त्यांच्यातील व्यवहाराची माहिती दिली होती. यावेळी त्याने त्यांना फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही.
त्यांच्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी हर्षा आणि दिप शहा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना हर्षाचे तिचे पती राजेंद्र शहा यांच्यासोबत प्रॉपटीवरुन कोर्टात खटला सुरु असल्याचे समजले होते. त्यांनी हर्षाला तेरा फ्लॅट दिले होते. त्यातील एक फ्लॅट तिने दुसर्या व्यक्तीला विक्री केल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटसाठी घेतलेले 75 लाख रुपये व्याजासहीत परत करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी त्यांना फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी नेहरुनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मायलेकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हर्षा शहा आणि दिप शहा यांच्याविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या 75 लाखांचा अपहार करुन वयोवृद्ध तक्रारदाराची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत आरोपी मायलेकांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.