खाजगी क्लिनिकच्या 19 लाखांचा कॅशिअर महिलेकडून अपहार
डॉक्टरच्या तक्रारीवरुन महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2026
मुंबई, – कांदिवलीतील एका खाजगी क्लिनिकमध्ये कॅशिअर म्हणून काम करणार्या महिलेने पेशंटकडून कॅश स्वरुपात आलेल्या सुमारे 19 लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरुन प्रतिभा मल्लिक पटेल ऊर्फ आदिती या कॅशिअर महिलेविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रतिक मुकेश ठक्कर हे व्यवसायाने डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतल राजेंद्रनगर परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे कांदिवलीतील पोईसर जिमखाना रोडवर डॉ. प्रतिक ठक्कर नावाचे एक खाजगी क्लिनिक आहे. तिथे पाच कर्मचारी कामाला असून प्रतिभा पटेल ही गेल्या दोन वर्षांपासून कॅशिअर म्हणून काम करते. क्लिनिकमध्ये रोख स्वरुपात तसेच ऑनलाईन पेमेंट घेतले जाते. रोख स्वरुपातील रक्कम नंतर प्रतिभा पटेल ही बँकेत जमा करते.
ऑक्टोंबर 2025 रोजी पेशेंटकडून येणार्या रोख रक्कमेबाबत प्रतिक ठक्कर यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अकाऊंट आणि रोख रक्कम यांची नोंद असलेली नोंदवहीची तपासणी केली होती. त्यात त्यांना पेशंटकडून आलेल्या रोख रक्कमेबाबत प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी प्रतिभा पटेलकडे विचारणा केली होती. मात्र तिने उडवाउडवीचे उत्तरे देऊन त्यांना काहीही सांगण्याचे टाळले होते. या प्रकारानंतर त्यांनी गेल्या दिड ते दोन वर्षांचे बँक खात्यात जमा होणार्या रक्कमेची तपासणी केली होती. त्यात त्यांना बँक खात्यात कमी जास्त प्रमाणात पैसे जमा होत असल्याचे दिसून आले.
याच दरम्यान त्यांनी क्लिनिकमधील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यात त्यांना काही पेंशट कॅश स्वरुपात पैसे देताना दिसून आले. मात्र ही रक्कम त्यांच्या अकाऊंट किंवा रोख रक्कमेच्या व्यवहारात दिसून आली नाही. चौकशीअंती एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रतिभा पटेलने पेशंटकडून येणार्या रोख रक्कमेतील 19 लाख 13 हजार 210 रुपयांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी तिच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रतिभा पटेलविरुद्ध पोलिसांनी क्लिनिकमधील पैशांचा अपहार करुन तक्रारदार डॉक्टरची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.