46 लाखांचे सोने घेऊन कारागिर पती-पत्नीचे पलायन

दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सोन्याचा अपहार केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2026
मुंबई, – सुमारे 46 लाख रुपयांचे 457 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन एका कारागिर पती-पत्नीने पलायन केल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध कुर्ला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सुकेंद्र रणजीत सामंता आणि मधुमिता सुकेंद्र सामंता अशी या आरोपी पती-पत्नींची नावे असून ते दोघेही मूळचे कोलकाताचे रहिवाशी आहेत. आरोपींच्या अटकेसाठी कुर्ला पोलिसांची एक टिम लकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रविण मारुती मटकर हे केबल व्यावसायिक असून कुर्ला येथे राहतात. न्यू मिल रोड परिसरात त्यांचा स्वतचा केबलचा व्यवसाय असून सुभाषनगर येथे त्यांच्या मालकीचे सात ते आठ रुम आहेत. त्यातील दोनमध्ये ते त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात तर उर्वरित रुम त्यांनी भाड्याने दिले आहेत. त्यापैकी दोनमध्ये सुकेंद्र आणि त्याची पत्नी मधुमिता हे दोघेही गेल्या वीस वर्षांपासून राहत होते. इतक्या वर्षांपासून एकमेकांच्या परिचित असल्याने त्यांच्यात कौटुंबिक संबंध होते. यातील एका रुममध्ये त्यांनी सोने-चांदी बनविण्याचा कारखाना सुरु केला होता. सुकेंद्र हा चांगला कारागिर असल्याने त्याच्याकडे अनेक ज्वेलर्स व्यापारी दागिने बनविण्यासाठी देत होते. त्यांनीही त्याला अनेकदा सोन्याची लगडी देऊन दागिने बनवून घेतले होते.

त्यांच्या आईचे काही जुने दागिने होते, ते दागिने मोडून त्यांना नवीन डिझाईनचे बांगड्या, हार आणि मंगळसूत्र बनवून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी त्याला विश्वासाने 220 ग्रॅम वजनाचे जुने दागिने दिले होते. फेब्रुवारी महिन्यांत त्यांनी सुकेंद्रकडे दागिन्यांविषयी विचारणा केली होती, यावेळी त्याने चार ते पाच दिवसांत दागिने बनवून देतो अस ेसांगितले. 17 फेब्रुवारीला सुकेंद्र व त्याची मधुमिता हे दोघेही कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यांनी त्यांना जुने दागिने मोडून नवीन दागिने बनविण्यासाठी दिले होते. तसेच त्यांनी इतर काही लोकांकडूनही दागिने घेतले होते. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,

मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. याच दरम्यान त्यांना सुकेंद्रने शातीलाल जैन यांच्याकडून 70 ग्रॅम, नरेश जैन यांच्याकडून 108 ग्रॅम वैशाली प्रकाश सोनी यांच्याकडून 118 सोने घेतल्याचे समजले होते. तसेच त्यांचे 220 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन ते दोघेही पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच प्रविण मटकर यांनी सुकेंद्रचा भाऊ अरविंद सामंताकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना त्यांया कोलकाता येथील गावी बोलाविले होते. सुकेंद्रला सर्वांचे दागिने परत करायचे आहे असे सांगितले. त्यामुळे ते स्वत त्याच्या कोलकाता येथील गावी गेले होते.

यावेळी त्याने त्यांना 59 ग्रॅम वजनाचे सोने परत केले. मात्र उर्वरित 457 ग्रॅम वजनाचे सुमारे 46 लाखांचे सोने परत न करता प्रविण मटकर यांच्यासह इतर तिघांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मुंबईत परत येताच सुकेंद्र आणि त्याची पत्नी मधुमिता यांच्याविरुद्ध कुर्ला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी सोन्याचा अपहार करुन चौघांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page