मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून 91 लाखांना गंडा

सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या आरोपीस भाईंदर येथून अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2026
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्याने तुमच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याची धमकी देऊन एका सेवानिवृत्त वयोवृद्ध महिलेची सुमारे 91 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी करण सुरेश कन्सारिया नावाच्या 49 वर्षांच्या आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. करणवर सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप असून फसवणुकीची काही रक्कम त्याच्याच बँक खात्यात जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. फसवणुकीसाठी या टोळीने दया नायक यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

रक्षा दिलीप मेहता ही 63 वर्षांची वयोवृद्ध महिला दहिसर येथे राहते. निवृत्तीनंतर तिला पेंशन मिळत असून त्यातून तिचा उदरनिर्वाह चालतो. 18 फेब्रुवारीला घरी असताना तिला अजय पाटील नाव सांगणार्‍या एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो कर्नाटकच्या बंगलोर, इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तिला व्हिडीओ कॉलवर येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी समोर एक व्यक्ती पोलीस गणेवशात होता. त्याने तिला पोलिसांनी एका ठिकाणी रेड केली होती. या कारवाईत सदाफत खान नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.

त्याच्याकडे पोलिसांना मोठ्या प्रमाणात आधारकार्ड, पॅनकार्ड आणि डेबीट कार्ड सापडले. त्यात तिच्या नावाचे एक डेबीट कार्ड सापडले असून तिच्या बँक खात्यात मनी लॉड्रिंगचे तीन कोटीचा व्यवहार झाला आहे. या व्यवहारातून तिला 75 हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे. यावेळी तिने संबंधित बँकेत तिचे कुठलेही खाते नाही, या खात्याचा तिचा काहीही संबंध नाही असे सांगितले. तरीही 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीदरम्यान त्याने तिची चौकशी सुरु ठेवली होती. तिची सर्व गुंतवणुक, इतर मालमत्ता, घरातील सदस्य तसेच त्यांच्या कामाविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यांचा तपास दया नायक करत असून यापुढे तेच तिची चौकशी करतील असे सांगितले. त्यानंतर तिला दया नायक नाव सांगणार्‍या एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला.

त्याने तिला तपासात सहकार्य करा. नाहीतर तुम्हाला अटक होईल अशी धमकी दिली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही माहिती कोणालाही शेअर करु नका असे सांगून तिच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर आहे. त्याने तिच्या बचत आणि एफडीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तिला वेगवेगळ्या शासकीय शिक्के असलेले पत्र पाठवून तिला तिची गुंतवणुक रक्कमेसह बँक खात्यातील रक्कम एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. या घटनेने ती प्रचंड घाबरली होती. अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. मात्र तिने स्वतला सावरत चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. अटकेच्या भीतीने तिने तिची एफडी तोडली आणि त्यातून आलेले 85 लाख आणि बचत खात्यातील रक्कम असे 91 लाख रुपये त्याने दिलेल्या नेनिफिशरी बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते.

15 मार्चला तिची मुलगी कृती मेहता ही तिच्या घरी आली होती, यावेळी तिने घडलेला प्रकार तिला सांगितला. यावेळी तिने पोलीस कधीही कोणाची ऑनलाईन चौकशी करत नाही. तिच्याबाबत सायबर फ्रॉड झाला असून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने सायबर हेल्पलाईन क्रमांकासह उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिताआणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, पोलीस हवालदार रवि पाटील, पोलीस शिपाई अक्षय साळवे यांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यात आली होती, त्यात करण कन्सारिया याच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले होते. या माहितीनंतर करणला भाईंदर येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाते दिल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम त्याने सायबर ठगांना दिली होती. त्यासाठी त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपीचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page