फ्लॅट गुंतवणुकीच्या आमिषाने आयटी अधिकार्‍याची फसवणुक

70 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मार्च 2026
मुंबई, – फ्लॅटमध्ये गुंतवुणकीच्या आमिषाने एका आयटी अधिकार्‍याची पाचजणांच्या टोळीने सुमारे 70 लाखांची फसवणुक केली. बुकिंग केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन या अधिकार्‍याची फसवणुक केल्याप्रकरणी पाचही आरोपीविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुदेश मनोहर मोरे, मयंक जिवराम जोशी, देवेंद्र हनुमान पांडे, निलेश चमनलाल सोनी आणि गणेश कोंडाजी सरनोबत अशी या पाचजणांची नावे आहेत. या पाचजणांची पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.

सुनिल चिंतामण घोंगे हे जोगेश्वरी येथे राहत असून एका खाजगी आयटी कंपनीत कामाला आहेत. मार्च 2022 रोजी त्यांना एका नवीन फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे त्यांनी त्यांचा इस्टेट एजंट मामाला ही माहिती दिली होती. त्याने त्यांची ओळख मयांक जोशीशी करुन दिली होती. मयांकने त्याचा मालाड येथील हाजी बापू रोडवर टॉवर 28 या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे सांगून त्यांना साईट पाहण्यासाठी मालाड येथे बोलाविले होते. त्यामुळे ते तिथे गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले. याच इमारतीच्या ए विंग, 601 क्रमांकाचा 450 चौ. फुटाचा फ्लॅट त्याने त्यांना स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते.

मयांकने हा प्रोजेक्ट शिवशक्ती बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्लपर्स कंपनीच्या मालकीचा असल्याचे सांगितले. त्यावेळेस फ्लॅटची किंमत 75 लाख रुपये इतकी होती. त्यात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि इतर खर्चाचा समावेश होता. त्यामुळे त्यांनी तो फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी शिवशक्ती बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्लपर्सच्या बँक खात्यात टप्याटप्याने सुमारे 70 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र या पेमेंटचे त्याने त्यांना रिसीट दिले नाही. तसेच रजिस्ट्रेशनबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. काही महिन्यानंतर त्याने पेमेंट रिसीट त्यांना व्हॉटअपवर पाठविले होते.

मात्र बांधकाम पूर्ण होऊन त्याने फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांच्या बुक केलेल्या फ्लॅटमध्ये दुसराच व्यक्ती राहत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते. याबाबत मयांककडे विचारणा केल्यानंतर बिल्डरने फ्लॅटचा ताबा दुसर्‍या व्यक्तीला दिल्याचे सांगून त्यांना तिसर्‍या मजल्यावरील ए/302 क्रमांकाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. यासंदर्भात त्याने सुदेश मोरे, निलेश सोनी आणि गणेश सरनोबतशी त्यांची ओळख करुन दिली होती. ते सर्वजण त्यांना फ्लॅटबाबत वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते.

याच दरम्यान त्यांना ए/303 फ्लॅटची या आरोपींनी अन्य व्यक्तीला विक्री केल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी कंपनीचे मालक आणि बिल्डर देवेंद्र पांडे यांची भेट घेतली होती, यावेळी त्याने त्यांना फ्लॅटचे पेमेंट मिळाले नाही असे सांगून इतर चौघांनी फ्लॅटचा पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचे सांगितले. इतर चारही आरोपींकडे विचारणा केल्यानंतर त्यांना टोलवाटोलवी सुरु केली होती. संबंधित पाचही आरोपींनी फ्लॅटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांची सुमारे सत्तर लाखांची फसवणुक केली होती.

त्यामुळे त्यांनी या पाचही आरोपीविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सुदेश मोरे, मयंक जोशी, देवेंद्र पांडे, निले सोनी आणि गणेश सरनोबत यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या पाचही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page