870 रुपयांसाठी सिगारेट विक्रेत्याला 100 मीटर फरफटत नेले

महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल तर चालकास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2026
मुंबई, – सिगारेटचे 870 रुपये मागितले म्हणून एका सिगारेट विक्रेत्याला चारजणांच्या टोळीने कारमधून शंभर मीटर फरफटत नेल्याची घटना मंगळवारी पहाटे जोगेश्वरी परिसरात घडली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या कारचालकास अटक केली. या गुन्ह्यांत इतर तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होताच ओशिवरा पोलीस अ‍ॅक्शनमध्ये आले आणि त्यांनी दोषीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

यातील तक्रारदार जोगेश्वरी येथे राहत असून रात्रीच्या वेळेस रस्त्यावर सिगारेट विक्रीचे काम करतो. मंगळवारी पहाटे चार वाजता तो जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, लकी बिर्याणी हॉटेलजवळ सिगारेट विक्री करत होता. याच दरम्यान तिथे पांढर्‍या रंगाची व्हॅगनार कार आली. या कारमध्ये एका महिलेसह तीन पुरुष होते. त्यांनी त्याच्याकडून 870 रुपयांचे सिगारेट घेतले, यावेळी त्याने त्यांच्याकडे सिगारेटचे पैसे मागितले होते, मात्र त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार देत त्याच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कारमधील महिलेने त्याचे कॉलर पकडले तर दुसर्‍याने त्याला बेदम मारहाण केली. त्याचा हात पकल्यानंतर कारचालकाने भरवेगात कार चालविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला शंभर मीटर फरफटत नेण्यात आले होते. यावेळी त्याच्या जिवाला धोका असल्याचे माहित असताना त्यांनी त्याला फरफटत नेले होते. हा प्रकार काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर शूट केला होता. काही वेळात हा व्हिडीओ संपूर्ण सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

ही माहिती प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी तक्रारदार सिगारेट विक्रेत्याचा शोध घेतला, त्याची जबानी नोंदवून त्याच्या तक्रारीवरुन कारचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या कारचालकाला काही तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले तर इतर तीनजण पळून गेले. 870 रुपयांच्या पैशांवरुन हा प्रकार घडला होता, त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश ओशिवरा पोलिसांना दिले आहे. त्यामुळे पळून गेलेल्या इतर तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page