अपहरणासह खंडणी व दरोड्याच्या गुन्ह्यांत दोन पोलिसांना अटक
दहा हजार रुपयांच्या विदेशी चलनाची लुटमार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2026
मुंबई, – विदेशी चलनाची डिलीव्हरीसाठी जाणार्या खाजगी कंपनीच्या एका अधिकार्याचे अपहरण करुन, कारमध्ये त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील दहा हजार डॉलर विदेशी चलन लुटमार करुन पळून गेलेल्या दोन पोलिसांना जुहू पोलिसांनी अटक केली. संदीप भिमराव शिंदे आणि गजेंद्र राजपूत अशी या दोघांची नावे असून यातील संदीप हा बीकेसी तर गजेंद्र जोगेश्वरी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पाचही आरोपीविरुद्ध अपहरणासह खंडणी आणि लुटमारीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथे राहतात. वांद्रे येथील एका खाजगी फॉरेक्स कंपनीत ते वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनीत विदेशी चलनाची देवाणघेवाण करते. बुधवारी 25 मार्चला ते दहा हजार रुपयांचे अमेरिकन डॉलर्स एका पार्टीला देण्यासाठी कंपनीच्या एर्टिगा कारमधून जात होती. दुपारी दोन वाजता ही कार विलेपार्ले येथील जुहू सर्कलवरुन रोड क्रमांक दहावरुन जात होती. याच दरम्यान त्यांना पाचजणांच्या एका टोळीने थांबवून त्यांच्या कारमधून त्यांचे अपहरण केले. जुहू येथून ते सर्वजण दहिसरच्या दिशेने निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली होती.
पोलीस असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्यावर कारवाईची धमकी दिली होती. दहिसर येथे आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने स्थानिक लोकांनी ही कार थांबविली. याच दरम्यान कारमधून चारजण त्यांच्याकडील विदेशी चलन घेऊन पळून गेले तर संजय शिंदे याला लोकांनी पकडून दहिसर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दहिसर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तक्रारदार अधिकार्याने घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह खंडणी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा विलेपार्ले परिसरात घडल्याने त्याचा तपास नंतर जुहू पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत संदीप शिंदे याला पोलिसांनी अटक केली. तपासात संदीप हा बीकेसी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असल्याचे उघडकीस आले. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर चार सहकार्यांची नावे समोर आले होते. त्यांचा शोध सुरु असतानाच रात्री उशिरा गजेंद्र राजपूत याला पोलिसांनी ताब्यात घेतला. गजेंद्र हादेखील पोलीस हवालदार असून तो सध्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतले आहे. या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून दोषी दोन्ही पोलिसांवर लवकरच निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.