मॉर्गज डिड असलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक

1.12 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2026
मुंबई, – मॉर्गज डिड असलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका स्क्रॅप व्यावसायिकाची जोडप्याने 1 कोटी 12 लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी जोडप्याविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. कृष्णा बाबूलाल शर्मा आणि किरण कृष्णा शर्मा अशी या दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

अहमद हुसैन अब्दुल कुद्रुस चौधरी हे स्क्रॅप व्यावसायिक असून कुर्ला परिसरात राहतात. सहा वर्षांपूर्वी त्यांना प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती, पत्नी आणि मुलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एक फ्लॅट खरेदीचा निर्णय घेतला होता. डिसेंबर 2020 रोजी त्यांच्या परिचित फराह खान हिने त्यांची ओळख कृष्णा शर्माशी ओळख करुन दिली होती. कृष्णा हा त्यांच्याच कुर्ला येथील किरोळ रोड, डॉन बॉस्कोसमोरील प्रिमिअर एक्झोटिका क्रमांक दोन इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 701 मध्ये राहत होता. त्याला त्याचा फ्लॅटची विक्री करायची होती, त्यामुळे अहमद चौधरी यांनी त्याच्या फ्लॅटची पाहणी केली होती.

फ्लॅट पाहिलनंतर त्यांनी त्याचा फ्लॅट खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा दोन कोटी वीस लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. या फ्लॅटवर कृष्णा आणि त्याची पत्नी किरण शर्मा यांनी एका खाजगी बँकेतून 44 लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड केल्यांनतर त्यांच्यात फ्लॅटचा करार करण्याचे ठरले होते. याच दरम्यान फ्लॅटसाठी अहमद चौधरीने त्यांना एक कोटी ऑनलाईन आणि रोख स्वरुपात दिले होते. तसेच बँकेचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे आणखीन साडेबारा लाख रुपये घेतले होते.

फेब्रुवारी 2021 व्यवहार पूर्ण होताच शर्मा कुटुंबियांकडून त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला होता. त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथे राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत त्यांच्या घरी एका सहकारी क्रेडिट सोसायटीचे अधिकारी आले होते. त्यांनी शर्मा पती-पत्नीने त्यांचा फ्लॅट मॉर्गज डिड करुन त्यांच्या क्रेडिट सोसायटीकडून कर्ज घेतल्याचे सांगितले. त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही म्हणून म्हणून ते कारवाईसाठी तिथे आल्याचे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी कृष्णा शर्माकडे याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने तो क्रेडिट सोसायटीचा संचालक असून हा त्यांचा अंतर्गत मामला आहे.

त्याने क्रेडिट सोसायटीकडून कुठलेही कर्ज घेतले नाही असे सांगितले. तसेच त्यांना मॉर्गज डिड क्लिअर करुन एनओसी घेऊन देतो असे सांगितले. मात्र त्याने त्यांना एनओसी दिली नाही. सतत विचारणा करुनही तो त्यांना टाळत होता. याच दरम्यान क्रेडिट सोसायटीने कोर्टात एक याचिका सादर केली होती. त्याची अलीकडेच सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने त्यांना फ्लॅटचा ताबा घेण्याचे आदेश दिले होते. याबाबत कोर्टाची नोटीस प्राप्त होताच अहमद चौधरीने फ्लॅटचा ताबा संबंधित अधिकार्‍यांकडे सोपविला होता.

कृष्णा शर्मा आणि किरण शर्मा यांनी क्रेडिट सोसायटीमध्ये फ्लॅट मॉर्गज डिड केले असताना त्यांच्यासोबत फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवाहर करुन त्यांची 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली. या प्रकारानंतर अहमद चौधरी यांनी विनोबा भावे नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून कृष्णा शर्मा आणि किरण शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page