पीजी गेस्ट हाऊसमध्ये 35 वर्षांच्या तरुणीची आत्महत्या
कौटुंबिक वादातून गळफास घेऊन जीवन संपविल्याचा संशय
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2026
मुंबई, – वांद्रे येथील एका सलोनमध्ये काम करणार्या 35 वर्षांच्या तरुणीने नारायण पीजी गेस्ट हाऊसमधील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. जिया अशोक गदर असे या तरुणीचे नाव असून तिच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. कौटुंबिक वादातून तिने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. तिच्या कुटुंबियांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून तिच्या आत्महत्येबाबत अधिकृत खुलासा होईल असे पोलिसांनी सांगितले.
जिया गदर ही मूळची गुजरातची रहिवाशी असून नोकरीनिमित्त ती मुंबई शहरात राहत होती. अविवाहीत असलेली जिया ही सध्या वांद्रे येथील सलोनमध्ये कामाला होती. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने ती महिलांसाठी असलेल्या बोरिवलीतील नारायण पीजी गेस्ट हाऊसमध्ये तिच्या इतर तीन ते चार मैत्रिणीसोबत राहत होती. शुक्रवारी दुपारी ती तिच्या रुममध्ये होती. मात्र बराच वेळ होऊन तिने दरवाजा उघडला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिच्या मैत्रिणीने बोरिवली पोलिसांना ही माहिती दिली.
घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना जियाने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे जियाने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून ती कौटुंबिक कारणावरुन मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
याबाबत पोलिसांनी अधिकृतपणे काहीही सांगण्यास नकार देत तपास सुरु असल्याचे सांगितले. जियाच्या आत्महत्येची माहिती तिच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून लवकरच जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून जियाने आत्महत्या का केली याचा खुलासा होईल असे सांगण्यात आले. दरम्यान जियाच्या आत्महत्येने तिच्या सहकारी मैत्रिणींना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.