मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2026
मुंबई, – कामावरुन घरी जाणार्या स्कूटीला डंपरची धडक लागून झालेल्या अपघातात लक्ष्मी मंगेश नांदगावकर या 35 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या डंपरचालक अमन रामदरश निशाद याला काही तासांत आरसीएफ पोलिसांनी अटक केली. हलगर्जीपणाने डंपर चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता चेंबूर येथील झामा चौक, चेंबूर कॅम्प बसस्टॉपजवळील सनातन विद्यालयासमोरील माहूलकडे जाणार्या वाहिनीवर झाला. मिनाक्षी मुकूंद लांडगे ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत माझगाव येथे राहते. मृत लक्ष्मी नांदगावकर ही तिची मोठी बहिण असून ती तिच्या दोन मुलीसोबत चेंबूरच्या माहुल, व्हिडीओकॉन अपार्टमेंटमध्ये राहत होती. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले असून पतीच्या निधनानंतर ती गेल्या दोन वर्षांपासून ब्लिनकिट या खाजगी कंपनीत डिलीव्हरी रायडर म्हणून काम करत होती. तिचे कार्यालय चेंबूरच्या सीता इस्टेट, एचपी पेट्रोलपंपाजवळ आहे.
शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ती कामावरुन तिच्या अॅक्टिव्हा स्कूटीवरुन घरी जात होती. तिची स्कूटी सनातन विद्यालयासमोरील माहूलकडे जाणार्या वाहिनीवरुन जात असताना भरवेगात जाणार्या एका डंपरचालकाने तिच्या स्कूटीला जोरात धडक दिली होती. अपघातात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या लक्ष्मीला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी मिनाक्षी लांडगे हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालक अमन निशाद याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून लक्ष्मी नांदगावकर हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर अमन हा जखमी महिलेस कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. मात्र डंपरच्या क्रमांकावरुन काही वेळात त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत अमन हा मूळचा उत्तरप्रदेशच्या आझमगढचा रहिवाशी असून सध्या चेंबूरच्या वाशीनाका, इंदिरानगर परिसरात राहतो. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.