एपीके फाईल पाठवून सोळा लाखांची ऑनलाईन फसवणुक

व्यापार्‍याच्या तक्रारीवरुन सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2026
मुंबई, – एपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक करुन मोबाईलमधील बँक खात्याची डिटेल्स प्राप्त करुन अज्ञात सायबर ठगाने एका व्यापार्‍याच्या बँक खात्यातून सुमारे सोळा लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पूर्व सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. 25 मार्चला सकाळी नऊ ते 26 मार्चला सायंकाळी सात या कालावधीत ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कौशिक जयवंतराय देसाई हे व्यवसायाने व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपरच्या गरोडिया नगर परिसरात राहतात. गेल्या 30 वर्षांचा त्यांचा सायंटिफिक लॅब मटेरियचा व्यवसाय आहे. 25 मार्चला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये काही बदल झाल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी जवळच असलेल्या एका मोबाईल शॉपमध्ये त्यांचा मोबाईल दाखविला होता. यावेळी मोबाईल दुरुस्ती करणार्‍या कर्मचार्‍याने त्यांच्या मोबाईलवर कोणीतरी एपीके फाईल पाठविली असून त्यांचा फोन सतत डायवर्ड होत आहे. त्यांचा मोबाईल हॅक करुन अज्ञात व्यक्तीने मोबाईलमधील सर्व माहिती घेतली आहे.

मोबाईलमध्ये काही सुधारणा करुन त्याने त्यांना मोबाईल परत केला. दुसर्‍या दिवशी त्यांना मोबाईलमध्ये पुन्हा काहीतरी फेरफार होत असल्याचे जाणवू लागले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. काही वेळानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार होत असल्याचे दिसून आले. त्यांच्या खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात काही पैसे ट्रान्स्फर होत होते. या प्रकारानंतर ते तातडीने त्यांच्या बँकेत गेले आणि तिथे उपस्थित बँक कर्मचार्‍यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंटची पाहणी केली होती.

त्यात त्यांच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तीने एपीके फाईल पाठवून त्यांचा मोबाईल हॅक केला होता. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार केल्याचे दिसून आले. या व्यवहारातून त्यांच्या खात्यातून सोळा लाख सात हजार रुपये डेबीट झाले होते. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रानस्फर झाली होती. ऑनलाईन फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह पूर्व सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page