मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका बाईकस्वाराने दुसर्या बाईकला दिलेल्या धडकेने आरिफ झियाझुद्दीन शेख या 27 वर्षांच्या बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी बाईकस्वार घटनास्थळाहून पळून गेला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बाईकचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या क्रमांकावर पळून गेलेल्या आरोपी बाईकस्वाराचा पोलीस शोध घेत आहेत.
हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेसात ते रात्री आठच्या सुमारास गोरेगाव येथील मिठागर, शास्त्रीनगर रोड क्रमांक एक, वेलनेस मेडीकलसमोर झाला. 65 वर्षांचे झियाझुद्दीन इकरम शेख हे गोरेगाव येथील ओशिवरा, लिंक रोडच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा साडीला वर्क करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा मोठा मुलगा अस्लम हा टेलर आहे तर आरिफ हा कार्निव्हल मॉलमध्ये कामाला आहे. आरिफ हा विवाहीत असून त्याची पत्नी आणि मुले ईदनिमित्त तिच्या गोरेगाव येथील माहेरी गेली होती.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आरिफ नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. सायंकाळी साडेसात वाजता तो त्याच्या बाईकवरुन कामावरुन घरी जात होता. मिठागर, शास्त्रीनगर रोड क्रमांक एकजवळून जाताना त्याला भरवेगात जाणार्या एका बाईकस्वाराने त्याच्या बाईक्ला जोरात धडक दिली होती. त्यात आरिफ गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर आरोपी बाईकस्वार त्याला कुठलीही वैद्यकीय मदत न देता किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता.
हा प्रकार एका रिक्षाचालकाच्या लक्षात येताच त्याने त्याला तातडीने त्याला रिक्षातून जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी झियाझुद्दीन शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध हलगजीपणाने बाईक चालूवन एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बाईकचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून याच क्रमांकावरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.