भिशीच्या पैशावरुन मनपा सफाई कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला

आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2026
मुंबई, – भिशीच्या पैशावरुन महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी असलेल्या कुमार नटराज विरमली (45) याच्यावर त्याच्याच परिचित आरोपीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना सायन-कोळीवाडा परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या कुमारला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी शाहिद रियाज अन्सारी या 25 वर्षांच्या आरोपीविरुद्ध अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

रश्मी कुमार विरमली ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत सायन-कोळीवाडा परिसरात राहते. कुमार विरमली हे तिचे पती असून तो महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला आहेत. शाहिद अन्सारी हा याच परिसरात राहत असून तो गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. एक वर्षांपूर्वी भिशीच्या पैशांवरुन कुमार आणि शाहिद यांच्यात वाद झाला होता. त्याने त्याच्या भिशीचे पैसे कापल्याचा कुमारवर शाहिदने आरोप केला होता.

याच कारणावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. शुक्रवारी रात्री दोन वाजता कुमार हा त्याच्या घरी होता. यावेळी तिथे शाहिद आला आणि त्याने भिशीच्या पैशांवरुन कुमारशी वाद घालण्यास सुरुवात केली. याच वादानंतर काही कळण्यापूर्वीच शाहिदने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने कुमार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांच्या दंडाला, नाकाला गंभीर दुखापत झाली होती. शाहिद हा प्रचंड आक्रमक झाला होता.

रक्तबंबाळ अवस्थेत कुमार हा वाचवा वाचवा असा ओरडाओरड करुन पळू लागला. त्याने त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर पुन्हा वार केले होते. यावेळी स्थानिक लोक जमा होताच शाहिद हा तेथून पळून गेला. या प्रकारानंतर रक्तबंबाळ झालेल्या कुमारला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

त्याची प्रकृती आता स्थिर आहे. ही माहिती हॉस्पिटलमधून प्राप्त होताच अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रश्मी विरमली हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शाहिद अन्सारीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर शाहिद हा पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page