दुरुस्तीसह पॉलिशासाठी दिलेल्या 18 कोटीच्या दागिन्यांचा अपहार

अपहारासह फसवणुकीप्रकरणी कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2026
मुंबई, – विश्वासाने दुरुस्तीसह पॉलिशसाठी दिलेल्या सुमारे अठरा कोटीच्या रुपयांच्या 1470 ग्रॅम वजनाच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा एका कारागिराने अपहार करुन पलायन केल्याची घटना झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी माणिक मदन धला या कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून या गुन्ह्यांत त्याला लवकरच अटक केली जाईल असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. ही घटना 2 डिसेंबर 2025 ते 28 मार्च 2026 या कालावधीत झव्हेरी बाजार येथील दादीशेठ अग्यारी लेन, पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक वीसमध्ये घडली.

विशाल महेंद्र भंडारी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतल कार्टर रोड, शिखल महल सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथे एक ज्वेलरीचे शॉप असून त्यांचा सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. माणिक धला हा त्यांचा परिचित कारागिर असून तो त्यांच्यासाठ सोन्याचे दागिने दुरुस्तीसह पॉलिश करण्याचे काम करत होता. झव्हेरी बाजार येथील दादीशेठ अग्यारी लेनवर त्याच्या मालकीचे एक वर्कशॉप आहे. याच वर्कशॉपमध्ये विविध ज्वेलर्स व्यापार्‍याकडून आलेल्या सोन्याचे दागिन्याचे दुरुस्तीसह पॉलिशचे काम केले जात होते.

डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत त्यांनी त्याला टप्याटप्याने 18 कोटीचे 1470 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने दुरुस्तीसह पॉलिश करण्यासाठी दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना सोन्याचे दागिने परत केले नाही. त्यामुळे ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये गेले होते. तिथे त्यांना माणिक धला हा दागिने घेऊन पळून गेल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तीन महिने उलटूनही तो त्यांना सापडला नाही. माणिकने विश्वासाने दिलेल्या दागिन्यांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून आरोपी माणिक धला याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अठरा कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन तक्रारदार ज्वेलर्स व्यापार्‍याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. माणिक हा मशिदबंदर येथील सॅम्युअल स्ट्रिट, आझाद चौकात राहत असून तो घरातून त्याच्या गावी पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांची एक टिम लवकरच त्याच्या गावी जाणार आहे. माणिकने तक्रारदार ज्वेलर्स व्यापार्‍यासह इतर काही व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page