शेअर ट्रेडिंग फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणारे चुलत बंधू गजाआड
बँक खात्यात फसवणुकीचे 55 लाख जमा झाल्याचे तपासात उघड
अरुण सावरटकर
2 एप्रिल 2026
मुंबई, – शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवून एका नामांकित कंपनीतून निवृत्त झालेल्या अधिकार्याला सुमारे 89 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी दोन चुलत बंधूंना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. योगेश्वर जगन्नाथ कुठे आणि ऋषिकेश भागवत कुठे अशी या दोघांची नावे असून ते मूळचे नाशिकचे रहिवाशी आहे. फसवणुकीसाठी त्यांनी सायबर ठगांना बँक खाते पुरविल्याचे तसेच त्यांच्याच बँक खात्यात सुमारे 51 लाख रुपये जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
54 वर्षांचे राजशेखरन हरिक्रिष्णन हे गोरेगाव येथील फिल्मसिटी रोड, मंत्रीसेरेन अपार्टमेंटमध्ये राहतात. सध्या ते जिओ स्टार या कंपनीत वरिष्ठ उपाध्याक्ष म्हणून कार्यरत होते. ही कंपीत दुसर्या कंपनीत विलीन झाल्याने त्यांची नोकरी गेली होती. त्यामुळे जानेवारी 2026 पासून ते घरीच आहे. घरी असताना त्यांना सोशल मिडीयावर शेअर ट्रेडिंगबाबत एक जाहिरात दिसली होती. ही जाहिरात ओपन केल्यानंतर त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. त्यात शंभर ते दिडशेहून अधिक सभासद होते. त्यात शेअर ट्रेडिंगबाबत माहिती दिली जात होती. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास सभासदांना किती फायदा होईल याबाबत माहिती दिली जात होती.
ग्रुपमध्ये येणार्या शेअरबाबत मॅसेजची तपासणी केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. याच दरम्यान त्यांना ग्रुपमधील प्रोफेसर संजीव दास, त्यांचे सहकारी सानिया गुप्ता आणि करण वर्मा यांनी संपर्क साधून शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एक नवीन खाते उघडण्यास सांगण्यात आले होते. त्यांचा विश्वास बसवा म्हणून त्यांनी त्यांना शेअर ट्रेडिंगची एक प्रोफाईल पाठवून ती फाईल पाठवून गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या प्रोफाईलनंतर त्यांनी वेगवेगळ्या शेअरमध्ये काही रक्कम गुंतवणुक केली होती. याच दरम्यान त्यांना एका ग्रुपमधून काढून दुसर्या ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते.
या ग्रुपमध्ये काही ठराविक व्यक्ती असून त्यांना गुंतवणुकीवर जास्त फायदा होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी त्यांची गुंतवणुक सुरुच ठेवली होती. 10 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 या कालावधीत त्यांनी वेगवेगळ्या शेअरमध्ये सुमारे 89 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता, त्यामुळे त्यांनी काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र सेबीची चौकशी सुरु असल्याने सर्व सभासदाचे खाते ब्लॉक झाल्याचे सांगण्यात आले. चिंता करु नका, तुम्ही रक्कम सेफ आहे, आपण सगळा व्यवहार कायदेशीर केला आहे.
व्यवस्थापन टिमसोबत चर्चा सुरु असून लवकरच त्यांना त्यांची रक्कम मिळेल असे सांगून त्यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रॉपटीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. विचारणा करुनही त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर दिली जात नव्हती. उलट त्यांना आणखीन 20 टक्के रक्कम भरल्यास त्यांचे ट्रेडिंग खाते पुन्हा होईल असे सांगून त्यांच्यावर पैसे भरण्यास दबाब टाकला जात होता. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
तपासात फसवणुकीची रक्कम नाशिकच्या एका बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले आहे. ही माहिती प्राप्त होताच प्रभारी पोलीस निरीक्षक किरण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक रोहन अहिरे, पोलीस हवालदार उतेश परब आणि रवी पाटील आदीचे एक पथक नाशिकला रवाना झाले होते. या पथकाने निफाडच्या पिंपळगाव येथून योगेश्वर कुठे आणि ऋषिकेश कुठे या दोन चुलत बंधूंना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. तपासात ते दोघेही मूळचे नाशिकच्या निफाड, पिंपगावचे रहिवाशी आहेत. यातील योगेश्वर कुठे याचे नाशिकच्या एका नामांकित बँकेत करंट खाते आहे. या खात्याची माहिती ऋषिकेशने काही सायबर ठगांना दिली होती.
ही माहिती शेअर केल्यानंतर फसवणुकीची सुमारे 51 लाख रुपये योगेश्वरच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर ती रक्कम त्यांनी संबंधित सायबर ठगांना दिली होती. बँक खाते वापरण्यास देऊन फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर या दोघांनाही मोठी रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. तपासात ही माहिती उघडकीय येताच त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. नाशिक येथून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणल्यानंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.