दागिने बनविण्यासाठी घेतलेल्या १.८४ कोटीचा सोन्याचा अपहार
सुरतच्या व्यावासायिकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – हिरेजडीत सोन्याचे दागिने बनविण्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपयांचे सोने घेऊन एका खाजगी कंपनी फसवणुक केल्याप्रकरणी सुरतचा व्यावसायिक गौतम वाघ याच्याविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गौतम हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
रौमिल नवीन संघवी हे वरळी येथे राहत असून लोअर परेल येथील प्रिझम इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. ही कंपनी दागिने बनविण्याचे व्यवसाय करत असून मौल्यवान रत्ने आणि हिर्यांचे उत्पादन करते. हिरेजडीत दागिने बनवून त्याची मुंबईसह देशभरात विक्री करणारी ही एक नामांकित कंपनी आहे. चार वर्षांपूर्वी त्यांची गौतम वाघशी ओळख झाली होती. गौतमची गुजरातच्या सुरत शहरात एम. एस अपेक्षा ज्चेल्स नावाची एक कंपनी आहे. त्याने तो सोन्याचा कच्चा माल घेऊन त्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतो असे सांगितले. त्याने त्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात हिरेजडीत दागिने बनवून देण्याचे आश्वासन देताना त्यांच्या कंपनीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे रौमिल संघवी यांच्या कंपनीच्या वतीने गौतम वाघची माहिती काढण्यात आली होती. या माहितीदरम्यान त्याच्याविरुद्ध अनेक व्यापार्यांन पॉझिटिव्ह माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्या कंपनीने त्याच्यासोबत व्यवहार करण्याचे ठरविले होतै. याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर गौतमच्या कंपनीसोबत त्यांनी एक करार केला होता. ठरल्याप्रमाणे कंपनीने त्याला काही हिरेजडीत सोन्याचे दागिने बनविण्याचे काम दिले होते. ते काम वेळेवर पूर्ण करुन त्याने कंपनीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला त्यांच्या कंपनीने १ कोटी ८४ लाख रुपयांचे ३००२ ग्रॅम वजनाचे हिरेजडीत सोन्याचे दागिने बनविण्याचे काम दिले होते.
सात दिवसांत ते काम पूर्ण करण्याचे आश्वासन गौतम वाघने दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना दागिने बनवून दिले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच रौमिल संघवी यांनी कंपनीच्या प्रतिनिधीला सुरत येथील गौतमच्या कार्यालयात पाठविले होते. मात्र दिलेल्या पत्त्यावर गौतमचे कार्यालय नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याचा मोबाईल बंद होता. गौतमकडून कंपनीकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ना. म जोशी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गौतमविरुदध हिरेजडीत दागिने बनविण्यासाठी रॉ गोल्ड घेऊन कंपनीची १ कोटी ८४ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या गौतमचा पोलीस शोध घेत आहेत.