बँकेच्या मॅनेजरला हॉटेलमध्ये आणून मौल्यवान मुद्देमालावर डल्ला
चोरीच्या गुन्ह्यांत रेकॉर्डवरील सराईत दोन महिलांना अटक
अरुण सावरटकर
10 एप्रिल 2026
मुंबई, – सोशल मिडीयावरुन ओळख निर्माण करुन शहरातील एका नामांकित बँकेच्या मॅनजरला गोराईतील हॉटेलमध्ये आणून त्यांच्याकडील सुमारे सव्वाचार लाखांचा मौल्यवान मुद्देमालावर डल्ला मारुन पळून गेलेल्या दोन रेकॉर्डवरील सराईत महिलांना गोराई पोलिसांनी अटक केली. बिमलादेवी श्रवणकुमार सिंग ऊर्फ हानी ठाकूर आणि रुथ लुकास नायडू अशी या दोघांची नावे असून त्या दोघीही मालाडच्या मालवणीतील रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन्ही आरोपी महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध काशिमिरा, मांडवी पोलीस ठाण्यात अशाच काही गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. या दोघींनी अनेकांना गोड बोलून हॉटेलमध्ये आणून त्यांच्याकडील मुद्देमालाची चोरी करुन पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मात्र त्यापैकी अनेकांनी बदनामीच्या भीतीने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
43 वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत वरळी येथे असून एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून कामाला आहे. सध्या त्यांची नेमणुक लोअर परेल येथील बँकेत आहे. 23 जुलैला त्यांना सोशल मिडीयावरील एका अॅपवर हानी ठाकूर नावाच्या एका महिलेने लाईक केले होते. त्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरु झाले होते. यावेळी हानीने ती मूळची हिमाचल प्रदेशची रहिवाशी असून सध्या मालाडच्या मालवणी परिसरात राहत असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी त्यांनी एकमेकांच्या व्हॉटअप क्रमांक शेअर केले होते. 18 ऑगस्टला ते दोघेही अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटले होते. तेथून ते दोघेही एका बारमध्ये गेले होते. मद्यप्राशन करताना त्यांची मैत्री झाली होती. यावेळी तिने त्यांना फिरायला तसेच नाईट स्टेबाबत विचारणा केली होती. तिच्या घरापासून गोराईजवळ असल्याने तिने तिथेच जाण्याची विनंती केली होती. त्यांनीही तिला होकार दिला होता.
ठरल्याप्रमाणे 28 ऑगस्टला गोराईतील एका हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी एक रुम बुक केला होता. 30 ऑगस्टला ती त्यांना बोरिवली रेल्वे स्थानकात भेटली. यावेळी तिच्यासोबत तिची एक मैत्रिण रुथ नायडू हीदेखील होती. ती तिच्यासोबत मालवणी परिसरात राहत होती. तिला फिरायला आवडत असल्याने ती तिच्यासोबत आल्याचे सांगितले. त्यामुळे ते तिघेही बोरिवलीहून गोराईतील हॉटेलमध्ये गेले होते. रात्री साडेआठ वाजता हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केले. रात्री जेवण करुन ते तिघेही रुममध्ये गेले होते. रात्री उशिरा ते तिघेही रुममध्ये झोपले होते. दुसर्या दिवशी तक्रारदारांना जाग आली असता त्यांना रुममध्ये हानी ठाकूर आणि तिची मैत्रिण रुथ नायडू कुठेही दिसली नाही. त्यांनी रुमसह हॉटेलमध्ये दोघींचा शोध घेतला, मात्र त्या दोघीही कुठेच सापडल्या नाही.
हॉटेलच्या कर्मचार्यांकडून त्यांना दोन्ही महिला सकाळीच हॉटेलमधून निघून गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी रुममध्ये ठेवलेला त्यांचा मोबाईल, कॅशिओ कंपनीचा एक महागडा घड्याळ, एक सोनसाखळी, एक लॉकेट, एक हातातील सोन्याचे कडे, एक मोबाईल, पाहणी केली. मात्र मोबाईलसह सोन्याचे दागिने आणि घड्याळ असा सुमारे सव्वाचार लाखांचा मुद्देमाल गायब होता. फिरायला जाण्याचा बहाणा करुन या दोघींनी त्यांना हॉटेलमध्ये आणले, त्यांना दारु पाजून रात्री त्यांच्याकडील सव्वाचार लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. सुरुवातीला त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तक्रारीमुळे त्यांची बदनामी होण्याची शक्यता असल्याने त्यांनी तक्रार केली नाही. 28 मार्चला त्यांना सोशल मिडीयावर काशिमिरा आणि मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची माहिती समजली होती.
याच गुन्हयांत दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली होती. या दोन्ही महिलांना संबंधित तक्रारदारांना हॉटेलमध्ये आणून त्यांच्याकडील दागिन्यांसह मोबाईल आणि कॅश चोरी करुन पलायन केले होते. ही माहिती समजताच त्यांनी गोराई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही महिलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी बिमलादेवी सिंग ऊर्फ हानी ठाकूर आणि रुथ नायडू या दोघींविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत या दोन्ही महिलांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात या दोन्ही महिला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. सोशल मिडीयावर ओळख निर्माण करुन या महिलांनी अनेकांना हॉटेलमध्ये आणून त्यांच्या मौल्यवान सामानाची चोरी केली होती. बदनामीमुळे अनेकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नव्हती. मात्र काही तक्रारदारांनी पोलिसांत तक्रार करताना या दोघींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना अटक करुन अशा प्रकारचे गुन्हे करणार्या या दोघींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते.