चारित्र्याच्या संशयावरुन होणार्‍या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या आरोपी पतीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जुलै २०२६
मुंबई, – चारित्र्यावरुन होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून मानसिक नैराश्यातून अनिता अरुण शिंदे नावाच्या एका ४५ वर्षांच्या महिलेने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पती अरुण गंगाराम शिंदे याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मार्च महिन्यांत अनिता आणि अरुण यांचा प्रेमविवाह झाला होता, त्याच्या संशयी वृत्तीमुळे लग्नाच्या अवघ्या साडेतीन महिन्यांत त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता घाटकोपर येथील पी. आर कदम मार्ग, असल्फा व्हिलेज, गणेश कमिटीच्या साने गुरुजीनगर, शांतीनगरात घडली. जितेश सोपान ओव्हाळ हे सुरक्षारक्षक असून सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर परिसरात राहतात. त्याचा मोठा भाऊ आणि दोन विवाहीत बहिणी पुण्यात राहतात. मोठी बहिण अनिता ही घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज परिसरात राहते. ती उजव्या पायाने अपंग असून लंगडत चालते. आठ वर्ष ती साकिनाका येथील एका कंपनीत कामाला होती. नोकरीदरम्यान तिची ओळख अरुण शिंदेशी झाली होती. या दोघांमध्ये मैत्री आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने अनिता आणि अरुण यांचा १९ मार्च २०२६ रोजी लग्न झाले होते.

लग्नानंतर अनिता ही अरुणसह त्याचे आई-वडिल आणि भावासोबत राहण्यासाठी आली होती. लग्नाच्या काही दिवसांत अरुण हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. याच कारणावरुन तो तिचा मानसिक व शारिरीक छळ करत होता. या वादानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते दोघेही घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे राहू लागले. यावेळी अरुण हा काहीच कामधंदा करत नव्हता. घरी आल्यानंतर तो क्षुल्लक कारणावरुन अनिताशी वाद घालून तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हा प्रकार तिने तिच्या कुटुंबियांना सांगितला होता.

अनिताला एसआरएचा फॉर्म भरायचा असल्याने ४ जुलैला सकाळी अकरा वाजता जितेश ओव्हाळने तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. तिच्या घरी गेल्यानंतर तिचे घर बंद होते. त्यानंतर जितेश तेथून निघून गेला. दुपारी त्याला अनिताने तिच्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. ही माहिती सजताच ओव्हाळ कुटुंबियांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. तिथे त्यांना अनिताला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले. ही माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जितेश ओव्हा याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याने अनिताच्या आत्महत्येला अरुण शिंदे हाच जबाबदार असल्याचा आरोप केला.

चारित्र्यावर संशयावरुन तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. या छळाला कंटाळून तिने मानसिक नैराश्यातून गळफास घेऊन संपविल्याचे जबानी म्हटले होते. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पती अरुण शिंदे याच्याविरुद्ध पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरुन मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. लग्नाच्या अवघ्या तीन ते साडेतीन महिन्यांत चारित्र्यांवर प्रेमविवाह झालेल्या पत्नीने आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page