नामांकित कंपन्यांच्या दूधात भेसळ करणार्या आरोपीस अटक
घटनास्थळाहून भेसळयुक्त दूधासह इतर साहित्य जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जुलै २०२६
मुंबई, – नामांकित कंपन्यांच्या दूधात भेसळ करुन भेसळयुक्त दूधाची परिसरात विक्री करणार्या एका मुख्य आरोपीस दहिसर युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. लिंगय्या कंटा असे या आरोपीचे नाव असून या कारवाईत पोलिसांनी अमुल, गोकुळ या नामांकित कंपन्याचे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, ३२७ रिकाम्या पिशव्या, दूध भेसळीसाठी लागणारे साहित्य, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि अन्न सुरक्षा आणि मानदे कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून परिसरात इतर कोणी भेसळयुक्त दूधाची विक्री करत आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
मुंबई शहरात दूधात भेसळ करणार्या काही टोळ्या सक्रिय असल्याने अशा दूध भेसळ करणार्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना दहिसर परिसरात काहीजण नामांकित दूध कंपन्यांच्या दूधात भेसळ करुन भेसळयुक्त दूधाची सर्वसामान्य नागरिकांना विक्री करत असल्याची माहिती युनिट बाराच्या अधिकार्यांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र अडाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, पूजा खांडेकर, विजय रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक किरण कोते, अजय सावंत, सहाय्यक फौजदार सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, संतोष राणे, कल्पेश सावंत, पोलीस हवालदार संतोष बने, नितीन पवार, शैलेश बिचकर, विजय पवार, हरिश्चंद्र भोसले, महिला पोलीस हवालदार समृद्धी गोसावी, अर्पिता पडवळ, पोलीस शिपाई चंद्रकांत शिरसाठ, स्वप्नील चंदनशिवे, अरुण धोत्रे आणि अन्न सुरक्षा अधिकारी तुषार शेळके व त्यांच्या पथकाने दहिसर येथील राजेश कंपाऊंडजवळील दुबे चाळ क्रमांक दोन, रुम क्रमांक बी-तीनमध्ये छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांनी लिंगय्या कंटा नावाच्या एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो रुममध्ये नामांकित कंपन्यांच्या दूधात भेसळ करताना रंगेहाथ मिळून आला. घटनास्थळाहून पोलिसांनी अमुल, गोकुळ या नामांकित कंपन्याचे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, ३२७ रिकाम्या पिशव्या, दूध भेसळीसाठी लागणारे साहित्य, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. भेसळयुक्त दूध घटनास्थळीच नष्ट करण्यात आले होते. याप्रकरणी लिंगय्या कंटाविरुद्ध पोलिसानी भारतीय न्याय सहिता, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या परिसरात इतर कोणी दूधात भेसळ करतो का, तो दूध भेसळीचा धंदा कधीपासून करतो, त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.