अपघाताचा आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करुन बदनामी
व्हिडीओ व्हायरल करणार्या यूट्यूब चॅनेलच्या मालकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 एप्रिल 2026
मुंबई, – सोशल मिडीयावर विमान अपघाताचे वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन त्यांची बदनामी केल्याच्या कटात अन्य एका आरोपीस पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अक्षय सोनाले असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अक्षयच्या पत्नीचे यूट्यूब चॅनेल असून या चॅनेलसाठी त्याने त्याचा मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशनसाठी दिला होता. याच मोबाईल क्रमांकावरुन त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी जालना येथून उद्धव भगवान कापसे या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अक्षय हा या गुन्ह्यांत अटक झालेला दुसरा आरोपी आहे.
जानेवारी महिन्यांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातात अजीत पवार यांच्यासह सहाजणांचा जागीच मृत्यू झाला होात. मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी एका खाजगी विमानाने अजीत पवार हे जात होते. यावेळी बारामती विमानतळावर लॅडिंगदरम्यान हा अपघात झाला हाता. एका शेतामध्ये विमान कोसळले होते. या अपघातात सोशल मिडीयावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये विमान अपघातात अनेकांनी शंका उपस्थित केले होते. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यात अजीत पवार यांच्या विमान अपघातात अनेक आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले होते.
या व्हिडीओ काही दिवसांत सुमारे दिड लाख फ्लोवर्स मिळाले होते. या व्हिडीओच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने अजीत पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केली होती. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना उद्धव कापसे या तरुणाला जालना येथून पोलिसांनी अटक केली होती. त्यात त्यानेच संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ अक्षय सोनाले याला दिला होता. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला होता.
तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात अक्षयने त्याच्या पत्नीच्या नावाने एक यूट्यूब चॅनेल सुरु केले होते. या चॅनेलचे रजिस्ट्रेशनसाठी त्याने स्वतचा मोबाईल क्रमांक दिला होता. या मोबाईल क्रमांकावरुन त्याची माहिती काढून त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चॅनेलवर अपलोड झालेल्या सर्व व्हिडीओची सायबर सेल पोलिसांकडून तपासणी सुरु आहे.