रॉबरीच्या गुन्हयांतील आरोपीचा माझगाव कोर्टात धिंगाणा
कोर्टासह पोलिसांना शिवीगाळ करुन ब्लेडने दुखापत करुन घेतले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ एप्रिल २०२४
मुंबई, – रॉबरीच्या गुन्ह्यांत अटक केलेल्या एका २७ वर्षांच्या आरोपीने गुरुवारी सायंकाळी माझगाव कोर्टात प्रचंड धिंगाणा घालून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना धमकावून, धक्काबुक्की करुन तोंडातून लपवून आणलेल्या ब्लेडने स्वतला दुखापत केली. या प्रयत्नात तो जखमी झाल्याने त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोहम्मद गौस पीरमोहम्मद पठाण असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भायखळा पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाणार आहे.
मोहम्मद गौस हा ऍण्टॉप हिल, ट्रॉन्झिंट कॅम्प परिसरात राहतो. गेल्या आठवड्यात त्याला रॉबरीच्या एका गुन्ह्यांत काळाचौकी पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी १८ एप्रिलला माझगावच्या लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची पोलीस कोठडीतून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यामुळे सायंकाळी त्याला जेल कस्टडी वॉरंट घेतल्यांनतर जेलमध्ये नेण्यात येणार होते. सायंकाळी साडेपाच वाजता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने कोर्टासह तिथे उपस्थित वकिल, कोर्ट स्टाफ आणि पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तोंडातून ब्लेडने पान काढून तुम्ही मला जेलममध्ये कसे नेता हे बघतो अशी धमकी देण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करुनही तो त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. काही वेळानंतर तो प्रचंड आक्रमक झाला होता. तो कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. याच दरम्यान त्याने ब्लेडने स्वतच्या मानेजवळ दुखापत केली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याला ताब्यात घेऊन जे. जे रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर रात्री उशिरा त्याला जेलमध्ये नेण्यात आले होते. या घटनेनंतर पोलीस हवालदार चंद्रशेखर दत्ताराम परब यांच्या तक्रार अर्जावरुन भायखळा पोलिसांनी मोहम्मद गौसविरुद्ध १८६, १८९, २९४, ३५३, ५०६ (२) भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने माझगाव कोर्टात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.