गिरणी कामगाराच्या म्हाडा फ्लॅट स्वस्तात देतो सांगून फसवणुक

आरोपी पती-पत्नीविरुद्ध अपहरारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 एप्रिल 2026
मुंबई, – गिरणी कामगाराना देण्यात आलेला म्हाडा फ्लॅॅट स्वस्तात देतो असे सांगून एका व्यक्तीची जोडप्याने सुमारे 31 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार लोअर परेल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन अरुण शिंदे आणि प्रियांका नितीन शिंदे यांच्याविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही मूळचे सातारा येथील माण, म्हसवडचे रहिवाशी आहेत. या दोघांनी म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

48 वर्षांचे तक्रारदार देवेंद्र बापू सोनावणे हे लोअर परेल येथे राहतात. त्यांच्या आईच्या मालकीची जुहू येथे एक रुम होती. तिथे ते त्यांच्या आई, भाऊ आणि बहिणीसोबत राहत होते. ऑक्टोंबर 2021 रोजी त्यांनी त्या रुमची विक्री केली होती. त्यातून त्यांच्या वाटणीला 40 लाख रुपये आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत भाड्याच्या रुममध्ये राहत आहे. त्यांना लोअर परेल परिसरात एक फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना नितीन शिंदेबाबत माहिती दिली होती. त्याच्याकडे म्हाडाच्या काही फाईल्स आहेत. तो गिरणी कामगारांना देण्यात आलेले म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले होते. त्यामुळे ते नितीन शिंदेला भेटण्यासाठी गेले होते.

यावेळी त्याने त्यांना लोअर परेल येथील हनुमान लेन, श्रीनिवास कॉटन मिल आणि नायगाव बॉम्ब डाईनमध्ये दोन गिरणी कामगाराच्या म्हाडाच्या फ्लॅटचे फाईल असल्याचे सांगितले. त्या फाईलची पाहणी केल्यानंतर त्यांनी त्यातील एक रुम खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. हा रुम 38 लाखांचा होता. फाईल मालकासह म्हाडा कार्यालयात पैसे भरण्यासाठी त्यांना आधी तीस लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. ठरल्याप्रमाणे ऑक्टोंबर 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत त्यांनी नितीन शिंदे व त्याची पत्नी प्रियांका शिंदे यांना टप्याटप्याने सुमारे 31 लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर एका महिन्यांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते.

मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. चौकशीनंतर या दोघांनी त्यांना दुसर्‍या ठिकाणी मोठी आणि चांगल्या लोकेशनचा फ्लॅट देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून म्हाडाची संंबंधित फाईल परत घेतली होती. मात्र त्यांनी त्यांना दुसरीकडे फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. याबाबत विचारणा करुनही ते दोघेही त्यांना प्रतिसाद देत नव्हते. गेल्या तीन चार वर्षांपासून ते फ्लॅटचा पाठपुरावा करत होते. मात्र त्यांच्याकडून त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ना. म जोशीम मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नितीन शिंदे आणि प्रियांका शिंदे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page