बोगस सोने तारण ठेवून ३९ लाखांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणुक
मालाड येथील घटना; बँक व्हॅल्यूअर महिलेसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ एप्रिल २०२४
मुंबई, – बोगस सोने तारण ठेवून बँकेने दिलेल्या सुमारे ३९ लाख रुपयांच्या कर्जाच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा आणखीन प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेच्या सोने व्हॅल्यूअर महिलेसह सहा खातेदाराविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सपना भट, शमी अनिल खत्री, जयनेंद्र जाधव, रफत शमी खत्री, यश जय पारेख आणि पारेख जलपाबेन यश अशी या सहाजणांची नावे आहेत. सपनाने बँक व्हॅल्यूअर म्हणून काम करताना अशा प्रकारे अनेक फसवणुक केले असून फसवणुक करणारी ती सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
साविओ मोंटरो हे बोरिवली परिसरात राहत असून ते मॉर्डल सहकारी बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. बँकेकडून त्यांच्या ग्राहकांसाठी सोने तारण योजना सुरु करण्यात आली असून त्यासाठी बँकेने सोने व्हॅल्यूअर म्हणून सपना भट हिची नेमणूक केली होती. सोने प्रमाणित करुन त्याची गुणवत्ता तपासणे, सोन्याचे वजन करुन त्याची किंमत निश्चित करणे, सोन्यावर देण्यात येणार्या कर्जाचे प्रमाण निश्चित करणे आदी काम सपना भट हिच्याकडे होती. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत मालाडच्या बँक शाखेत लॉरेन्स नरोन्हा हे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. यावेळी बँकेच्या सहा खातेदारांनी सोने तारण योजनेसाठी अर्ज केला होत. १० ऑगस्ट ते १८ नोव्हेंबर २०२१ या सहाजणांनी बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. यावेळी सपना भट हिने बँक व्हॅल्यूअर म्हणून काम पाहिले होते. सोन्याची तपासणी, किंमत निश्चित केल्यानंतर या खातेदारांना बँकेकडून सुमारे ३९ लाख रुपयांच्या सोने तारण कर्जाचे वाटप करण्यात आले होते. कर्जाची ही रक्कम सहा खातेदारांच्या बँक खात्यात जमा झाली होती. मात्र कर्ज घेतल्यानंतर या सहाजणांनी कर्जाचे हप्ते भरले नव्हते. त्यामुळे या सर्वांना बँकेकडून नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र नोटीस बजावूनही त्यांच्याकडून बँकेला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे बँकेने त्यांच्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली होती.
कर्जाच्या वसुलीसाठी दागिन्यांची फेर मूल्याकंन गरजेचे होते. त्यामुळे बँकेच्या पॅनेलवरील ज्वेलर्स व्यापार्याकडे ते सर्व दागिने तपासणीसाठी दिले होते. या दागिन्यांची तपासणी केल्यानंतर खातेदारांनी सोने तारण कर्जासाठी दिलेले सर्व दागिने बोगस असल्याचे उघडकीस आले होते. खातेदारांनी बोगस दागिने दिले असतानाही सपना भट हिने ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन खातेदारांना कर्ज देण्यास सांगून बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच साविओ मोंटरो यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शनिवार २० एप्रिलला सपना भटसह इतर पाचही खातेदाराविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सपना ही सराईत गुन्हेगार असून तिने अशाच प्रकारे इतर काही बँकेची फसवणुक केली आहे. तिच्याविरुद्ध कांदिवली, ओशिवरा, मालाड, बांगुरनगर, गोरेगावसह इतर पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत तिला पोलिसांनी अटक केली होती.