हेव्ही डिपॉझिटच्या साडेबारा लाखांचा अपहार करुन फसवणुक

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या एजंटला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या साडेबारा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड एजंटला धारावी पोलिसांनी अटक केली. नावेद उबेर खान असे या एजंटचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शाहीनबानो मोहम्मद मोहसीन बेग ही 45 वर्षांची महिला धारावी येथे राहत असून घरकाम करते. तीन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले असून मुलगा दुबईत नोकरीस आहे. तीन वर्षांपूर्वी ती तिच्या कुटुंबियांसोबत धारावीतील आकाश अपार्टमेंटमध्ये राहत असताना तिची नावेद खानशी ओळख झाली होती. त्यावेळेस नावेद हा त्याच्या पत्नीसोबत त्यांच्याच शेजारीच राहत होता. या ओळखीदरम्यान तिला नावेद हा रुम भाड्याने देण्याचे एजंट म्हणून काम करत असल्याचे समजले होते. ती राहत असलेल्या फ्लॅटचा करार ऑगस्ट 2023 रोजी संपत होती, तिला अचानक फ्लॅट खाली करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने नावेदला हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट बघण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने तिला धारावीतील एमएल वाडी, करीमभाई लालभाई चाळीतील एक फ्लॅट दाखवून फ्लॅटमालक त्याचा चांगला मित्र आहे. तिथे तिला हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.

तिला तातडीने फ्लॅट खाली करायचा असल्याने तिने नावेदवर विश्वास ठेवून त्याला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर घेण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी त्यांच्यात साडेचौदा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे ठरले होते. त्यामुळे तिने नावेदला कॅश स्वरुपात साडेचौदा लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात एका वर्षांसाठी साडेचौदा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचा एक करार करण्यात आला होता. या करारानंतर ती तिच्या कुटुंबियांसोबत फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेली होती. तीन महिन्यानंतर नावेद तिच्या घरी आला, त्याने आकाश अपार्टमेंटमधील त्याचा फ्लॅट त्याच्या पत्नीसोबत होणार्‍या भांडणामुळे त्याला सोडावे लागत आहे. त्यामुळे त्याच्या फ्लॅटमध्ये त्यांनी राहण्यासाठी यावे अशी विनंती केली होती.

याबाबत नवीन भाडेकरार होताच ती तिच्या कुटुंबियांसोबत आकाश अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी गेली होती. यावेळी नावेदने त्यांना दोन लाख रुपये परत केले होते. तिथे काही महिने राहिल्यानंतर त्यांना फ्लॅटमालकाने फ्लॅट खाली करण्यास सांगितले. त्यामुळे तिने नावेदकडे तिच्या साडेबारा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटची मागणी केली होती. मात्र त्याने तिला तिचे पैसे दिले नाही. हेव्ही डिपॉझिटच्या साडेबारा लाखांचा अपहार करुन त्याने तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने नावेदविरुद्ध धारावी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता, अखेर त्याला दोन दिवसांपूर्वीच त्याला धारावी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने शाहीनबानोने दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page