उसने पैसे नकार दिला म्हणून प्रेयसीच्या घरी हातसफाई
27 लाखांच्या चोरीच्या मुद्देमालासह प्रियकराला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – उसने पैसे नकार दिला म्हणून प्रियकराने बार सिंगर असलेल्या प्रेयसीच्या घरी सुमारे 30 लाखांच्या मुद्देमालावर हातसफाई केल्याची घटना साकिनाका परिसरात घडली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना तक्रारदार बार सिंगरच्या प्रियकराला साकिनाका पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली. मजहर अहमद रमजानअली अन्सारी असे या 43 वर्षीय आरोपी प्रियकराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 27 लाखांचे चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास कांदे यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
35 वर्षांची तक्रारदार महिला ही मूळची कोलकाताची रहिवाशी असून सध्या साकिनाका परिसरात राहते. गेल्या सोळा वर्षांपासून ती मुंबई शहरात वास्तव्यास असून तेव्हापासून ती मजहर अन्सारीला ओळखते. त्यांच्यात प्रेमसंबंध असून तो नियमित तिच्या घरी येत होता. सध्या ती साकिनाका येथील एका बारमध्ये बार सिंगर म्हणून काम करते. तिने तिच्या पैशांतून काही सोन्या-चांदीचे दागिने, नाणी खरेदी केले होते. तसेच सेव्हिंग म्हणून काही पैसे जमा केले होते. ही कॅश तसेच दागिने तिने कपाटातील एका बॅगेत ठेवले होते. सोळा वर्षांपासून भाड्याने राहत असल्याने तिला स्वतचे घर घ्यायचे होते, त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. 12 एप्रिलला सायंकाळी सात वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. यावेळी तिच्या घरी कोणीही नव्हते.
रात्री दिड वाजता ती तिच्या घरी आली होती, यावेळी तिला घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने कपाटाची पाहणी केली होती. यावेळी तिला सोन्याचे दागिन्यासह कॅश असलेली बॅग चोरीस गेल्याचे दिसून आले. या बॅगेत साडेतीन लाखांची कॅश आणि उर्वरित सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल होता. जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकाराने तिने मजहरला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. या घटनेनंतर तिने साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश साकिनाका पोलिसांना दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास कांदे, पोलीस हवालदार पिसाळ, गांजाळे, पार, भिंगावडे, राठोड, पोलीस शिपाई साळुंखे, महाजन यांनी तपास सुरु केला होता. तक्रारदार महिलेच्या चौकशीतून मजहर हा तिचा प्रियकर होता. तिच्या गुंतवणुकीसह दागिन्यांविषयी मजहरला माहिती होती. अनेकदा तो तिच्याकडून उसने पैसे मागत होता, तिचा प्रियकर असल्याने ती त्याला नेहमीच मदत करत होती, मात्र अलीकडेच तिने त्याला उसने पैसे देणे बंद केले होते.
गुन्ह्यांच्या दिवशी तो कुठे होता याची माहिती काढत असताना त्याने तो राजस्थानच्या अजमेर असल्याचे सांगितले. कॉल रेकॉर्डवरुन तो तिथे असल्याचे उघडकीस आले. मात्र तो सांगत असलेला माहिती विसंगत असल्याचे दिसून आले. हाच धागा पकडून पोलीस उपनिरीक्षक सुहास कांदे व त्यांच्या सहकार्यांनी घाटकोपर येथून मजहर अन्सारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्याने त्याचा या गुन्ह्यांत सहभाग नसल्याचे सांगितले, मात्र पोलिसी इंगा दाखवताच त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. तक्रारदार महिलेने त्याला उसने पैसे देण्यास नकार दिला होता. ती गावातील घरासाठी पैशांची जमवाजमव करत होती.
ही कॅश आणि दागिने घेऊन ती तिच्या कोलकाता येथील गावी जाणार होती. त्यामुळे त्याने ती गावी जाण्यापूर्वी तिच्या घरात हातसफाई करण्याची योजना बनविली होती. त्याच्याकडे तिच्या फ्लॅटची चावी होती. 12 एप्रिलला ती कामावर गेल्यानंतर तो तिच्या घरी आला आणि त्याने सर्व सामान अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील दागिने आणि कॅश असलेली बॅग घेऊन तो पळून गेला. त्याने त्याच्या दुसर्या मोबाईलवरुन अजमेरचे विमानाचे तिकिट काढले होते. गुन्ह्यांच्या दिवशी आपण अजमेरला असल्याचा दिखावा केला,
मात्र विमानाने काही तासांत मुंबईत परत आला होता. तपासात ही माहिती बाब समोर येताच पोलीस उपनिरीक्षक सुहास कांदे यांच्यासह पोलीस हवालदार पिसाळ, गांजाळे, पार, भिंगावडे, राठोड, पोलीस शिपाई साळुंखे, महाजन यांनी घाटकोपर येथून मजहरला ताब्यात घेतले आणि या चोरीच पर्दाफाश केला. त्याच्याकडून 26 लाख 95 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.