अॅण्टॉप हिल येथील अपहरणासह रॉबरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश
सहाजणांच्या टोळीस चोरीच्या रॉबरीच्या कॅशसहीत अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2026
मुंबई, – कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची 32 लाख 50 हजार रुपयांची कॅश घेऊन जाणार्या एका कर्मचार्याचे अपहरण करुन त्याच्याकडील कॅश असलेली बॅग चोरी करुन पळून गेलेल्या गुन्ह्यांचा अवघ्या सहा तासांत पर्दाफाश अॅण्टॉप हिल पोलिसांनी पर्दाफाश करुन सहा आरोपींना अटक केली. राहुल एकनाथ गायकवाड, इरफानअली अहमदअली खान, विवेक विलास काकडे, संतोष वसंत मलेकर, स्वप्नील चंद्रकांत पाटील आणि मोहम्मद रिझवान अन्सार अशी या सहाजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी 29 लाख 69 हजाराची रॉबरीची रक्कम परत मिळविण्यात यश मिळविले आहे. अटकेनंतर सहाही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रवण लक्ष्मण रावल हे विरार येथे राहत असून सांताक्रुज येथील गिता अॅपेक्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कपड्याच्या कंपनीत आर्थिक व्यवहाराच्या देवाणघेवाणीचे काम करतात. ही कंपनीत यश गंगावणी आणि हनी गंगावानी यांच्या मालकीची असून त्यांच्या कुटुंबियांची अन्य एक कंपनी आहे. या दोन्ही कंपनीसह शॉपचे आर्थिक व्यवहाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. 14 एप्रिलला त्यांना कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपवर 50 लाखांची रक्कम राम गंगावणी यांना सायन-कोळीवाडा येथे देण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे 50 लाखांची कॅश घेऊन वांद्रे येथील बीकेसी परिसरात आले होते. तेथून ते मेघल फॅब्रिक्स शॉपमध्ये गेले होते. तेथून त्यांनी व्यवहाराची 32 लाख 50 लाखांची कॅश ताब्यात घेतली.
ठरल्याप्रमाणे त्यांनी 50 लाखांची कॅश राम गंगवाणी यांच्या पत्नी गिता गंगावणी यांना दिली आणि उर्वरित कॅश घेऊन ते कंपनीच्या दिशेने निघाले होते. सायन-कोळीवाडा, समिती पंजाबी कॅम्प येथून ते रेपीडो टॅक्सी बुक करत होते. याच दरम्यान तिथे दोन तरुण आले. ते दोघेही त्यांच्याकडे पाहत होते, हा प्रकार संशयास्पद वाटताच ते पुढे चालत निघाले. याच दरम्यान तिथे एक स्कॉपिओ कार आली आणि कारमधील चार अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबदस्तीने स्कॉपिओ कारमध्ये बसविले. कारमध्ये या चौघांनी त्यांची चौकशी सुरु केली होती. सुरुवातीला ते पोलीस असल्याचे समजून त्यांनी त्यांना सर्व माहिती सांगितली. तोपर्यंत ही कार घाटकोपरला आली होती.
एका ब्रिजजवळ कार थांबवून या चौघांनी त्यांच्याकडील 32 लाख 50 हजार रुपयांची कॅश चोरी करुन त्यांना तिथे सोडून पलायन केले होते. हा प्रकार अॅण्टॉप हिल पोलिसांना सांगून त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध अपहरणासह रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत अॅण्टॉप हिल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, समीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, शिवाजी मदने, प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनवलकर, पोलीस हवालदार गस्ते, टेळे, ठोके, पोलीस शिपाई ठाकूर, पाटील, आमदे, बाबर, माने, विसपुते, माने, किरतकर, सजगाणे आदी पथकाने आरोपींचा शोध केला होता. त्यापैकी दोन आरोपींना नालासोपारा तर एक आरोपी कुर्ला येथून ताब्यात घेण्यात आले. या तिघांच्या चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांचे इतर तीन सहकारी गुन्ह्यानंतर गोव्याला पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर या पथकाने गोव्याहून इतर तिघाां ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी 29 लाख 69 हजाराची कॅश हस्तगत केली. उर्वरित कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत ते सर्वजण पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.