मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2026
मुंबई, – कामानिमित्त बहिणीने आणलेली साडेचार लाखांची कॅश अल्मारीतील लॉकरमधून चोरी करुन भावाने पलायन केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी राकेश कुलदीप ओगल या आरोपी भावाविरुद्ध आंबोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. बहिणीनेच भावाविरुद्ध चोरीची तक्रार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
37 वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरीतील अपना बाजार, पंचवटी इमारतीमध्ये राहते. तिची लहान बहिण मानसिक विकलांग असून लहान भाऊ राकेश हा लहानसहान काम करतो. ती स्वत शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करते. पंधरा दिवसांपूर्वी तिचा भाऊ राकेश हा मित्राकडे राहायला जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. 19 एप्रिलला दुपारी दोन वाजता ती एका लग्नासाठी गेली होती. यावेळी तिने घरातील बेडरुममधील अल्मारीमध्ये साडेचार लाखांची कॅश ठेवली होती.
घराबाहेर जाण्यापूर्वी तिने लॉकर लॉक केले होते. दुसर्या दिवशी ती रात्री आठ वाजता घरी आली होती. यावेळी तिला बेडरुममधील अल्मारीचे लॉकर उघडे असल्याचे दिसून आले. त्यात साडेचार लाखांची कॅश नव्हती. त्यामुळे तिने तिच्या बहिणीकडे पैशांविषयी विचारणा केली होती. तिने घरी राकेश आला होता. त्याच्यासोबत चावी बनविणारा एक व्यक्ती होता. थोडा वेळ थांबवून राकेश हा घरातून निघून गेला होता. त्यानंतर तिने इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे राकेशविषयी विचारणा केली.
यावेळी त्याने राकेश हा आल्याचे सांगून तिची स्कूटर घेऊन गेल्याचे सांगतले. घरातील साडेचार लाखांची कॅश तिच्या भावाने चोरी करुन पलायन केल्याची खात्री होताच तिने घडलेला प्रकार आंबोली पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी राकेश ओगल याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच राकेशची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.