सहा महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झालेल्या पत्नीची आत्महत्या
चारित्र्यावरुन पत्नीचा शोषण करणार्या पतीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2026
मुंबई, – सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झालेल्या शताक्षी स्वप्निल चांदीवडे या 23 वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या केल्याप्रकरणी स्वप्निल कृष्णा चांदीवडे या आरोपी पतीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला आहे.
ही घटना सोमवारी सकाळी पावणेआठ ते आठच्या सुमारास घाटकोपर येथील भटवाडी, कातोडीपाडा, न्यू दयासागर, दत्त मंदिराजवळील साईधाम सेवा चाळीत घडली. याच परिसरात साक्षी निलेश भावेकर ही 25 वर्षांची महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत ती खाजगी नोकरी करते. शताक्षी ही तिची लहान बहिण असून ती तिच्याच शेजारी राहत होती. नोव्हेंबर 2025 तिने स्वप्निलसोबत लव्ह मॅरेज केले होते. लग्नानंतर काही दिवसांत स्वप्निल हा शताक्षीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिच्याशी वाद घालून तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. शेजारी राहणार्या बहिणीकडे पाठवत नव्हता. याबाबत साक्षीसह तिच्या मावशीने शताक्षीची विचारपूस केल्यानंतर तिने स्वप्निल तिचा चारित्र्यावर संशय घेऊन प्रचंड मानसिक व शारीरिक शोषण करत असल्याचे सांगत होती.
टेलरिंगच्या क्लासवरुन घरी आल्यानंतर तिचा मोबाईल तपासणे, उशिर झाला तिला मारहाण करत होता. लग्नानंतर काही दिवसांत त्याच्याकडून सुरु झालेल्या मानसिक व शारीरिक छळाला शताक्षी ही प्रचंड कंटाळून गेली होती. तिला मानसिक नैराश्य आले होते. सोमवारी 20 एप्रिलला सकाळी सात वाजता शताक्षीने नेहमीप्रमाणे पाणी भरले. पावणेआठ वाजेपर्यंत सर्व काम करुन ती रुममध्ये गेली होती. यावेळी स्वप्निल हा घरीच झोपला होता. यावेळी रुममध्ये तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार साक्षी भावेकरला समजताच तिने तिला तातडीने जवळच्या संत मुक्ताबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी साक्षी भावेकर हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिने तिच्या जबानीत शताक्षीच्या आत्महत्येला स्वप्निल हाच कारणीभूत असल्याचा आरोप केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्याला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे जबानीत म्हटले होते. या जबानीनंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी स्वप्निल चांदीवडे याच्याविरुद्ध स्वतच्या पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला आहे. शताक्षी आणि स्वप्निल यांचा नोव्हेंबर 2025 रोजी प्रेमविवाह झाला होता, सहा महिन्यांतच चारित्र्यावरुन पत्नीचा छळ करुन त्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या दोघांचा वैवाहिक जीवन सहा महिन्यांचा ठरल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये शोककळा पसरली आहे.